पुणे – एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून या योजनेंतर्गत अंगणवाड्यांमधील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांचे सेवासमाप्तीचे वय शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आले आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचा दिनांक प्रत्येक वर्षाचा ३० एप्रिल हा निश्चित करण्याबाबत केंद्र शासनाने मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत.
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीबाबत दिनांक ३० नोव्हेंबर २०१८ व दिनांक फ़ेब्रुवारी २०२३ रोजीच्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने कार्यवाही करताना खालील कार्यपध्दतीचा अवलंब करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. ज्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा कार्यालयातील नोंदीनुसार जन्म दिनांक १ जानेवारी ते दिनाक १ मे (दोन्ही दिवस धरून) या कालावधीतील असेल त्यांना त्याच कॅलेंडर वर्षाच्या दिनांक ३० एप्रिल या दिनांकास सेवानिवृत्त करण्यात यावे.
ज्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा कार्यालयातील नोंदीनुसार जन्मदिनांक २ मे ते ३१ डिसेंबर (दोन्ही दिवस धरून) या दरम्यान असेल त्यांना पुढील कॅलेंडर वर्षाच्या ३० एप्रिल या दिनांकास सेवानिवृत्त करण्यात यावे. या कार्यपध्दतीच्या अनुषंगाने सदर शासन निर्णयाच्या दिनांकापासून कार्यवाही करण्यात यावी. याबाबतच्या सविस्तर सूचना एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त यांनी सर्व क्षेत्रीय यंत्रणांना देण्यात याव्यात असे आदेश महिला व बाल विकास विभागाने जारी केलेले आहेत.