शिवाजी रस्त्यावरील घटना; चोरटे दुचाकीवरुन पसार
पुणे : शिवाजी रस्त्यावर सेवानिवृत्त पोलिसावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून त्याच्याकडील मोबाइल संच हिसकावून नेल्याची घटना घडली. पोलिसाने चोरट्यांना प्रतिकार केला. मात्र, चोरटे दुचाकीवरुन पसार झाले. ही घटना मंगळवारी रात्री घडली.
प्रकाश जयकुमार कुरले (58,स्वारगेट पोलिस लाईन) यांनी यासंदर्भात खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कुरले नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. सध्या ते स्वारगेट पोलीस वसाहतीत राहायला आहेत.
मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास कुरले मित्रासह शिवाजी रस्त्यावरून निघाले होते. घनश्याम लॉजजवळ दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी कुरले यांना धमकावले आणि त्यांचा मोबाइल हिसकावला. कुरले यांनी चोरट्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांनी कुरले यांच्या हातावर कोयत्यासारख्या तीक्ष्ण शस्त्राने वार केला. यानंतर चोरटे दुचाकीवरुन पसार झाले.
कुरले यांनी चोरट्यांच्या गाडीची नंबर प्लेट बघितली असता, त्यावर चिखल लावलेला होता. यानंतर कुरले यांनी त्वरीत खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिली. चोरट्यांनी केलेल्या हल्ल्यात कुरले किरकोळ जखमी झाले आहेत. गणेशोत्सवात शहरात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रस्त्यावर पोलिस असतानाही चोरटे असे धाडस करताना दिसत आहेत. याप्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक राठोड करत आहेत.