पुणे – व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी नोंदणी बंधनकारक

31 मे “डेडलाइन’ : प्रवेश नियामक प्राधिकरणाची संस्थांना तंबी

पुणे – शैक्षणिक वर्ष 2019-20 साठी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी संस्थांना नोंदणी करणे आवश्‍यक आहे. प्रवेशासाठी नोंदणी न करणाऱ्या महाविद्यालये किंवा संस्थांचा प्रवेश प्रक्रियेत सहभाग करण्यात येणार नाही, अशी तंबी देत संस्थांनी 31 मे पर्यंत नोंदणी करण्याचे आदेश प्रवेश नियामक प्राधिकरणने दिले आहे.

राज्यातील खासगी, शासकीय, विनाअनुदानित, अनुदानित, महापालिका, अल्पसंख्याक आरोग्य विज्ञान, तंत्रशिक्षण, उच्च शिक्षण, आयुष शिक्षण, कृषी शिक्षण, कला शिक्षण, पशू व मत्स्य विज्ञान शिक्षण या अभ्यासक्रमांच्या महाविद्यालय आणि संस्थांना प्रवेश नियामक प्राधिकरणने सूचना दिल्या आहेत. यावर्षीच्या पदव्युत्तर व पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश पडताळणी व प्रवेश मान्यतेच्या प्रक्रियेसाठी प्रवेश नियामक प्राधिकरणच्या “सफलता’ या ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्‍यक होते. यावर संस्थांनी आवश्‍यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक होते. तथापि, अनेक महाविद्यालयांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण न केल्याचे दिसून येत आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी महाविद्यालयांची नोंदणी प्रक्रिया अत्यंत आवश्‍यक असून, नोंदणी पूर्ण करण्यासाठी 31 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती प्रवेश नियामक प्राधिकरणचे सचिव आनंद रायते यांनी दिली.

ज्या महाविद्यालयांना शैक्षणिक वर्ष 2019-20 साठी नवीन मान्यता प्राप्त झालेली आहे. परंतु अद्याप आवश्‍यक कागदपत्रे प्राप्त झालेली नाहीत. त्या महाविद्यालयांची नोंदणी प्रक्रिया कागदपत्र मिळाल्यानंतर करून घेण्यात येईल. दरम्यान, महाविद्यालय किंवा संस्थांनी पोर्टलवर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत, त्यांना यंदाच्या शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेतून वगळण्यात येणार असल्याचे रायते यांनी म्हटले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here