हप्तेखोरी सुरू असल्याचा नागरिकांकडून आरोप
आंबेगाव बुद्रुक (प्रतिनिधी) – कात्रजकडून नवले पुलाकडे जाताना रस्त्यावरच खुलेआम वेश्या व्यवसाय सुरू आहे. वर्दळ असलेल्या रस्त्यावर हा “धंदा’ सुरू आहे. पोलिसांना हप्ते मिळत असल्याने त्यांच्यापुढेच टिच्चून खुले आम वेश्या व्यवसाय सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात असून हा परिसरच “रेड लाइट एरिया’ म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. सामान्य कुटुंबातील महिला, विद्यार्थिनींना येथून जाणे-येणेही अवघड झाले आहे.
याकामी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेत हा प्रकार बंद करावा, अशी मागणी होऊ लागली आहे. कात्रज नवले पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वेश्या व्यवसायामुळे परिसरातील नागरिक त्रस्त आहेत.
याबाबत कोणी तक्रार केल्यानंतर काही दिवस येथे उभे राहण्यास मनाई केली जाते, पोलिसांना हप्ता वाढवून दिल्यानंतर हा प्रकार पुन्हा सुरू होतो, असे नागरिकांचे म्हणणे आहे. या भागाच्या मध्यवर्ती भागांत वेश्या व्यावसाय सुरू असताना पोलिसांकडून दुर्लक्ष होणे म्हणजे कायद्याची अब्रू वेशिला टांगण्याचाच प्रकार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
अवैध धंद्याचा अड्डा…
नवले पूल परिसरात वेश्यांसह तृतीयपंथी, ट्रान्सजेंडर यांचाही सुळसुळाट झाला आहे. येणाऱ्या-जाणाऱ्या दुचाकी चालकांना लिफ्ट मागून त्यांच्याकडून पैशाची मागणी करण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. हा परिसर अवैध धंद्याचा अड्डा झाला असून पोलीस यंत्रणेकडून मात्र कुठलीही कारवाई करण्यात येत नाही. या धंद्यात मोठे अर्थकारण दडले असल्याची चर्चा आहे.
कर्मचारी महिलांना त्रास…
या भागात अनेक छोटे-मोठे उद्योग-व्यवसाय आहेत. त्यामुळे येथे स्थानिक तसेच पुणे शहर परिसरातून महिला नोकरीसाठी येत असतात. परंतु, या रस्त्यावरून कामाच्या ठिकाणी जात असताना अनेकांकडून विचित्र अनुभव येत असल्याची संतप्त प्रतिक्रिया कर्मचारी महिला व्यक्त करीत आहेत.
नवले पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वेश्या व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. याबाबत आम्ही नुकतीच कारवाई केली असून, पुन्हा असा प्रकार घडत असेल तर कठोर कारवाई केली जाईल.
– जगन्नाथ कळसकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन