कोरेगाव भीमा -राज्य सरकारने निश्चित केल्यानुसार (दि. 19) रोजी करोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेऊन छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा करावा, असे आवाहन शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या वतीने मार्गदर्शक सूचना पत्रकाद्वारे केले आहे. करोना संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता शिवजयंती साजरी करत असताना शिवज्योत आणण्याकरिता 200 भाविकांना व शिवजयंती उत्सवाकरिता 500 भाविकांना परवानगी देण्यात येत आहे.
यावर्षी सांस्कृतिक कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन न करता याऐवजी सदर कार्यक्रमाचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाइन प्रक्षेपण उपलब्ध करुन देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी. प्रभात फेरी, बाईक रॅली अथवा मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला/प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करुन त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे.
शिवजयंतीच्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे करोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करताना त्या ठिकाणी सोशल डिस्टनिंसग तसेच स्वच्छतेचे नियम पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.