पुणे – शहरातील वाढती करोना बाधितांची संख्या लक्षात घेता महापालिका प्रशासनाने “रॅपीड ऍन्टीजेन टेस्ट’ वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. सुपर स्प्रेडर ठरू शकतील, अशा ठिकाणी जाऊन नागरिकांची चाचणी केली जाणार आहे. यामध्ये भाजी विक्रेते, दुकाने आदींचा समावेश आहे.
करोना बाधितांची संख्या दिवसाला वेगाने वाढत आहे. यापार्श्वभूमीवर “सुपर स्प्रेडर’ ठरू शकणारे रुग्ण लवकर शोधून काढण्यासाठी महापालिकेने रॅपीड ऍन्टीजेन टेस्ट वाढविण्याचा निर्णय घेतला आहे, त्यानुसार महापालिकेने कर्मचाऱ्यांची रॅपीड ऍन्टीजेन टेस्ट करण्याला सुरूवात केली आहे. यामध्ये एक कर्मचारी करोना बाधित आढळून आला आहे. प्रत्येक विभागातील कर्मचाऱ्यांची टप्प्याटप्प्याने टेस्ट केली जाणार आहे.
लस आणि पुरेसा औषध साठा
महापालिकेकडे लस आणि औषधांचा पुरेसा साठा आहे. 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी लवकरच “वॅक्सिन ऑन व्हील’हा उपक्रम राबवला जाणार आहे. तसेच जंम्बोच्या स्ट्रक्चर ऑडीट संदर्भातही संबंधितांना सूचना दिल्या आहेत. मास्क न घालणाऱ्यांवर आणि रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आले आहेत, त्यानुसार कारवाईला सुरूवात झाल्याचे आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.