पुणे (गणेश आंग्रे) – करोना मृतांच्या कुटुंबियांना द्यावयाच्या नुकसान भरपाईची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. यासाठी 25 हजार 287 अर्ज दाखल झाले आहेत. प्रशासनाकडील आकडेवारीनुसार प्रत्यक्षात करोना मृतांची संख्या 19 हजार 251 आहे, त्यामुळे निकषात बसणारे अधिकचे अर्ज ही नवी समस्या जिल्हा प्रशासनापुढे निर्माण झाली आहे. तांत्रिक तपशीलातील फरकामुळे 5 हजार 484 इतक्या मृतांचा फरक पडत असून याबाबत प्रशासनाला योग्य ठोस निर्णय घ्यावा लागणार आहे.
“आयसीएमआर’कडे नोंदविलेल्या आकडेवारीनुसार पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात 19 हजार 251 व्यक्तींचा मृत्यू करोनामुळे झाल्याची नोंद आहे. या करोना मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून 50 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचे जाहीर करण्यात आले आहे.
यानुसार राज्य शासनाकडे पुणे जिल्ह्यातून एकूण 25 हजार 287 इतके अर्ज आले आहेत. शासनाकडे असलेली करोना मृतांची आकडेवारी व प्रत्यक्षात आलेले अर्ज यामध्ये फरक असल्याचे दिसून येत आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राज्य शासनाकडून ही आर्थिक मदत करण्यात येत आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून ही मदत देण्याचे परिपत्रक महसूल विभागाकडून काढण्यात आले. राज्य शासनाने मदतीची रक्कम लाभार्थींच्या थेट बॅंक खात्यात जमा करण्याकरिता संकेतस्थळ तयार केले आहे.
राज्यात जी व्यक्ती कोविड-19 या आजारामुळे निधन पावली आहे तसेच जर त्या व्यक्तीने कोविड-19चे निदान झाल्यामुळे जरी आत्महत्या केली असेल अथवा करोनाचे उपचार रुग्णालयात घेतल्यानंतर 30 दिवसांमध्ये मृत्यू झाला असल्यास तरी त्या मृत व्यक्तीच्या निकटच्या नातेवाईकास 50 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे.
यामुळे तफावत…
करोनामुळे व्यक्तीचा मृत्यू रुग्णालयात झाला असल्यास संबंधित रुग्णालयांकडून आयसीएमआरवर नोंद केली जाते. काही रुग्णालयांकडून आयसीएमआरवर नोंद न करणे अथवा रुग्णालयातून घरी सोडल्यानंतर मृत्यू झाला असल्यास त्या व्यक्तीची नोंद झालेली नसणे यामुळे ही तफावत आली असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
उर्वरित अर्ज लवकर मंजूर…
जिल्हा प्रशासनाने मंजूर केलेले अर्ज राज्य शासनाकडे जातात, राज्य शासनाकडून थेट संबंधित व्यक्तीच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जात आहेत. त्यानुसार आतापर्यंत एकूण 5 हजार 601 करोना मृतांच्या कुटुंबीयांना 50 हजार रुपयांची मदत मिळाली आहे. यामध्ये पुणे शहरातील 2 हजार 935, ग्रामीणमधील 1 हजार 316 आणि पिंपरी चिंचवड मधील 1 हजार 350 करोना मृतांच्या कुटुंबियांना मदत मिळाली आहे. उर्वरित अर्ज लवकर मंजूर करून त्यांच्या बॅंक खात्यामध्ये मदत जमा केली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
क्षेत्र मृतांची संख्या संकेतस्थळावर आलेले अर्ज फरक
पुणे शहर 9118 12,471 3052
पिंपरी चिंचवड 3827 5486 1540
ग्रामीण 6306 7330 892
एकूण 19251 25287 5484