पुणे – भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जांभुळवाडी, दत्तनगर, आंबेगाव आदी परिसरामध्ये काही व्यक्ती बेकायदा प्लॉटिंग करुन त्याची विक्री करत आहेत.मात्र या बेकायदा प्लॉटिंगवाल्यांनाच ब्लॅकमेलिंग करण्याचे प्रकार स्थानिक लोकप्रतिनिधी व काही स्थानिक माध्यमप्रतिनिधी करत आहेत.
शहरातील उपनगरांमध्ये एक ते दोन गुंठ्याचे तसेच डोंगर उतारावरील प्लॉट विकण्याचे सत्र मोठ्या प्रमाणात सुरु आहे. हे प्लॉटींग बेकायदा असले तरी स्वस्त:मध्ये प्लॉट मिळत असल्याने अनेकांकडून त्याची खरेदी केली जात आहे.
ही बाब ओळखून बेकायदा प्लॉटींग करणारे रिक्षा, बस यांच्यावर जाहिरातबाजी करत सावज जाळ्यात अडकवतात. मात्र दुसरीकडे भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असे बेकायदा प्लॉटिंग करणाऱ्यांनाच स्थानिक लोकप्रतिनिधी काही स्थानिक माध्यम प्रतिनिधींना हाताशी धरुन ब्लॅकमेल करत आहेत.
त्यांना तक्रार देण्याची भिती दाखवत लाखो रुपये उकळले जात आहेत. प्लॉटची विक्री बेकायदा असल्याने याप्रकरणाची पोलिसांकडे तक्रार केली जात नाही. तसेच आपण तक्रार केल्यास आपल्यावरही गुन्हा दाखल होऊ शकतो अशी भिती प्लॉट धारकांना वाटत आहे.
मात्र पोलिसांनी अशा प्रकारे कोणाला ब्लॅकमेल झाले असेल तर त्यांनी न घाबरता तक्रार द्यावी असे आवाहन केले आहे. याप्रकारे एका प्लॉट धारकाकडून खंडणी उकळण्यात आल्याचा प्रकार काही महिण्यांपुर्वीच उघडकीस आला होता.