लखनौ -उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने ब्राह्मण आणि इतर समाजांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. त्याचा संदर्भ घेऊन कॉंग्रेसने सत्तारूढ भाजप आणि इतर विरोधी पक्षांना राजकीय आव्हान दिले आहे. मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून ब्राह्मण चेहऱ्याला प्रोजेक्ट करून दाखवा, असे कॉंग्रेसने म्हटले आहे.
उत्तरप्रदेशात पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. ती रणधुमाळी डोळ्यासमोर ठेऊन राजकीय पक्षांनी ब्राह्मण मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध कार्यक्रम हाती घेतले आहेत. त्या कार्यक्रमांची कॉंग्रेस नेते ललन कुमार यांनी खिल्ली उडवली.
भाजप, सप आणि बसप या पक्षांकडून राजकीय ड्रामा सुरू आहे. त्यांचे ब्राह्मणांवर एवढेच प्रेम असेल तर त्या समाजातील चेहरा ते मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून पुढे का करत नाहीत? कॉंग्रेसने उत्तरप्रदेशला सर्वांधिक सहा ब्राह्मण मुख्यमंत्री दिले.