यंदा सव्वादोन कोटी रुपयांचा महसूल
पुणे – चित्रपट, मालिका, जाहिरातीत दिसणारी स्थानके आणि रेल्वेचे परिसर हे रेल्वे प्रशासनासाठी उत्पन्नाचा मार्ग ठरत आहेत. मध्य रेल्वेला चित्रपटांची चित्रिकरणे आणि रेल्वे कोचेसद्वारे यंदाच्या आर्थिक वर्षात 2 कोटी 18 कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न मिळाले आहे. आतापर्यंतचे मध्य रेल्वेला मिळालेले हे सर्वाधिक उत्पन्न आहे.
चित्रपटांसह विविध माध्यमांत अनेक रेल्वेचे “सीन्स’ दिसतात. यामध्ये बऱ्याचदा रेल्वे स्थानके, रेल्वे शेड आदी ठिकाणी चित्रीकरण केले जाते. यासाठी रेल्वेकडून चित्रीकरणासाठी शुल्क आकारण्यात येते. 2013-14 या आर्थिक वर्षात 1.73 कोटी रुपयांचे सर्वाधिक उत्पन्न मिळाले होते. करोनामुळे 2020-21 मध्ये 41.16 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. मागील अनेक वर्षांचा रेकॉर्ड ब्रेक करत यंदा रेल्वेने 2.18 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.
मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, वाडीबंदर, मनमाड, मुलुंड आरपीएफ ग्राउंड, माथेरानसह पनवेल, लोणावळा, खंडाळा, वाठार, सातारा आदी रेल्वे स्थानकांना चित्रीकरणासाठी पसंती देण्यात येते. यासाठीच्या परवानगीची प्रक्रिया सोपी होण्यासाठी आता एक खिडकी प्रणाली देखील सुरू केली असल्याची माहिती प्रशासनाने दिली.