कमलेश गिरी
आपण यापूर्वीच शोधलेले ज्ञान आणि नवीन ज्ञान प्राप्त करण्याची प्रक्रिया या दोहोंचा भाग म्हणून विज्ञानाचा विचार केला जाऊ शकतो. ज्ञान आणि प्रक्रिया एकमेकांवर अवलंबून असतात. निसर्गाचे रहस्य जाणून घेण्याची उत्सुकता मानवाला नेहमीच असते. याच उत्सुकतेचे फलित म्हणून माणूस चंद्रावरही पोहोचला. माणसाने अंतरिक्षात इतके प्रयोग केले आहेत, की अंतरिक्षाचे संपूर्ण रहस्य समोर आले आहे. विज्ञानाच्या आधारे मानवाने चंद्रावर वसाहती बनविण्याचीही कल्पना केली. स्पेस टूरिजम हादेखील श्रीमंत कंपन्यांचा व्यवसाय बनला. विज्ञान एवढी प्रगती करेल याची कल्पनाही एके काळी माणसाने केली नव्हती. आता लवकरच चंद्रावर हायस्पीड इंटरनेटची सुविधा उपलब्ध होणार आहे. नासा ही अमेरिकी अंतरिक्ष संशोधन संस्था आणि नोकिया कंपनी संयुक्तपणे चंद्रावर 4-जी एलटीई कनेक्टिव्हिटी उपलब्ध करणार आहेत. भविष्यासाठी नासाची योजना अशी आहे की, मानव चंद्रावर पुन्हा एकदा जाईल आणि मानवी वसाहती स्थापन करील. 2024 पर्यंत मानवाला चंद्रावर नेण्याचे नासाचे उद्दिष्ट आहे. चंद्रावर 4-जी नेटवर्क उभारण्यासाठी ज्यांची निवड करण्यात आली आहे ते आहेत नोकियाचे चीफ स्ट्रॅटेजी अँड टेक्नॉलॉजी ऑफिसर निशांत बत्रा.
या प्रकल्पाची धुरा एका भारतीयाच्या हाती आहे, याचा आपल्याला अभिमान असायला हवा. निशांत बत्रा यांचा जन्म दिल्लीतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. इंदूर (मध्य प्रदेश) येथील अहिल्यादेवी विद्यापीठातून त्यांनी संगणकशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले. निशांत बत्रा यांना टेलिकॉम क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव आहे. ते एरिक्सन कंपनीत दहा वर्षांपेक्षा अधिक काळ होते आणि जानेवारी 2020 मध्ये ते नोकियामध्ये रूजू झाले. भारतातील अभियंते आणि आयटी क्षेत्रातील तज्ज्ञ हे जगात सर्वोत्कृष्ट आहेत आणि ते या क्षणी तंत्रज्ञानाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. भविष्यातही ते अशीच भूमिका बजावणार आहे. आता भारतातही ऍप्लाइड इनोव्हेशनमध्ये मोठे काम केले जात आहे. भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्थेने (इस्रो) मानवाला अंतरिक्षात पाठविण्याच्या मोहिमेवर काम सुरू केले आहे. आतापर्यंत केवळ नासानेच चंद्रावर मानवयुक्त मोहिमा केल्या आहेत. नील आर्मस्ट्रॉंग हा 1969 मध्ये चंद्रावर उतरणारा पहिला मानव होता. नासाला 2024 पर्यंत चंद्रावर मानव पाठविण्याआधी तेथे संपर्कयंत्रणा प्रस्थापित करायची आहे.
आता निशांत बत्रा यांच्या नेतृत्वाखाली चंद्रावरील लूनर नेटवर्क काही महिन्यांतच सत्यात उतरेल. नोकियाचे म्हणणे असे आहे की, त्यांच्या आर्मबेल संशोधन प्रयोगशाळेतील नवकल्पनांचा उपयोग चंद्राच्या पृष्ठभागावर अल्ट्रा-कॉम्पॅक्ट, लघुशक्ती, स्पेस-टाइट एन्ड-टू-एन्ड एलटीई सोल्यूशन विकसित आणि तैनात करण्यासाठी केला जाईल. नोकियाने अशा 14 कंपन्यांशी करार केला आहे, ज्या लूनर लॅंडरच्या मदतीने चंद्रावर आवश्यक उपकरणे पोहोचवतील. त्यामुळे चंद्रावर जाणाऱ्या प्रवाशांना थेट कॉल करण्याची सुविधा मिळेल. हे नेटवर्क अंतराळवीरांना व्हॉइस आणि व्हिडिओ अशा दोन्ही कम्युनिकेशन सुविधा प्रदान करेल. नेटवर्क अशा प्रकारे तयार केले जाईल, जेणेकरून ते अतिशय प्रतिकूल परिस्थितीत लूनर आणि लूनर लॅंडरच्या लॉंचच्या वेळी आणि अंतरिक्षातही कार्यरत राहू शकेल. चंद्रावरील विजेची कमतरता भरून काढण्यासाठीही काही उपकरणे चंद्रावर पाठवली जातील.
या संपूर्ण प्रकल्पासाठी नासाने नोकियाला 14.1 दशलक्ष डॉलरचा निधी दिला आहे. नासाला चंद्रावर अंतराळवीर पाठविण्याचे आपले उद्दिष्ट पूर्ण करायचे असेल तर संस्थेला वेगाने नवीन तंत्रज्ञान विकसित करावे लागेल. चंद्राच्या पृष्ठभागावर दीर्घकाळ टिकू शकेल अशा ऊर्जा प्रणालीची चंद्रावर गरज असून, चंद्रावर राहण्याची क्षमताही विकसित करावी लागणार आहे. सर्व व्यवस्था झाली तर अंतराळवीरांना पृथ्वीवर फोन करण्यात कोणतीच अडचण येणार नाही. निशांत बत्रा पूर्ण क्षमतेने या प्रकल्पात गुंतले आहेत. या नेटवर्कला कायदेशीर मान्यता मिळविण्यासाठी किती कालावधी लागेल, हे सांगता येत नसले तरी हे नेटवर्क खूपच सुरक्षित असून, ते सामान्य नागरिकांसाठी खुले नाही.
चंद्रावर गेल्यानंतर तुम्ही केवळ फोनवरूनच नव्हे तर व्हॉइस कॉलच्या माध्यमातूनही स्मार्टफोनवर बोलण्याचा आनंद लुटू शकाल, असे काही वर्षांपूर्वी सांगितले असते तर तुमचा विश्वास बसला नसता. परंतु आता लवकरच ते शक्य होणार आहे. चंद्रावर 4-जी नेटवर्कच्या मदतीने तुम्ही बेस स्टेशनवर हाय डेफिनेशनमध्ये व्हिडिओ चालवू शकाल. यापूर्वी काही कंपन्यांनी चंद्रावर 5-जी नेटवर्क सुरू करण्याचा प्रयत्न केला होता; परंतु 5-जी इंटरनेट सेवेची स्टॅबिलिटी कमी असल्यामुळे हे नेटवर्क चंद्राच्या पृष्ठभागावर व्यवस्थित कार्यरत होऊ शकले नाही. नासा आणि निशांत बत्रा यांच्या या प्रकल्पाशी संबंधित कंपन्या सध्या खूपच उत्साहात आहेत. त्यांच्या या प्रकल्पामुळे चंद्राच्या पृष्ठभागावर कायमस्वरूपी राहण्याचा मार्गही मोकळा होण्यास मदत होणार आहे.