सुनील राऊत
पुणे – शहरातील बचतगटांना वर्षभर हक्काची बाजारपेठ मिळावी या उद्देशाने महापालिकेच्या वतीने आता शहरात सुपर मार्केटच्या धर्तीवर बचतगटांच्या उत्पादनासाठी “पुण्यश्री’ बाजार सुरू केले जाणार आहेत. सिंहगड रस्त्यावरील महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या आधार केंद्राच्या जागेत सुमारे 3 हजार चौरस फूट जागेत हा बाजार सुरू केला जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी सांगितले.
हा प्रकल्प महापालिका जिल्हा परिषद, खादी ग्रामोद्योग, मधुमक्षिका पालन केंद्राच्या सहकार्याने सुरू केले जाणार आहे. या स्वरूपाचे बाजार जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चालविण्यात येत असून त्याच धर्तीवर हे बाजार असणार आहेत.
उत्पादनाला मिळणार हक्काची जागा
महापालिकेकडून बचतगटांना अनुदान दिले जाते. तसेच, त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी या उद्देशाने दरवर्षी दिवाळीत बचत बाजारही भरविले जातात. मात्र, वर्षभर विक्रीसाठी असे उपक्रम होत नाहीत. बचतगटांच्या वस्तूंना वर्षभर चांगली मागणी असल्याने आता या माध्यमातून कायमस्वरूपी हक्काची बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. मात्र, त्याचवेळी बाजारपेठेत केवळ बचतगटांच्या वस्तू न ठेवता, जिल्हा परिषदेचे काही बचत गट, खादी ग्रामोद्योग, मध उत्पादने अशी शासकीय उत्पादनांसह, काही व्यावसायिक कंपन्यांची उत्पादनेही ठेवली जाणार आहेत.
महापालिकेकडून शहरात बचतगटांसाठी पाच ठिकाणी ही मार्केट पालिकेच्या परिमंडळ निहाय सुरू केली जाणार आहेत. त्यासाठी जागा निश्चित करण्याचे काम सुरू आहे. पहिले केंद्र सिंहगड रस्त्यावरील महापालिकेच्या आधार केंद्राच्या मिळकतीत सुरू केले जाणार आहे. शहरात पाच ठिकाणी ही केंद्र सुरू होणार असून जास्तीत जास्त बचतगटांना त्यात सहभागी करून घेता येणार आहे.
“महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या बचतगटांसाठी पुण्यश्री मार्केट महत्वाची ठरणार आहे. सध्या बचतगटांना उत्पादन विक्रीसाठी अडचणी येतात, अशा वेळी त्यांना हक्काची बाजारपेठ मिळाल्यास त्यांना हक्काचे उत्पन्न मिळणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेची मदत घेण्यात येणार असून त्यांच्याशी सामंजस्य करारही केला जाणार आहे.” – विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका