हडपसर – यंदा निर्बंधविरहीत गणेशोत्सव साजरा केला जात आहे. असे असले तरी नैसर्गिक विसर्जन स्थळांवर म्हणजे हडपसर मधून वाहणारा नवीन कालवा तसेच मांजरी बुद्रुक येथील मुळा-मुठा नदी पात्र येथे नागरिकांनी थेट गणेश विसर्जन करू नये. तर , महापालिकेच्या हडपसर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सुमारे ३६ ठिकाणी मूर्ती संकलनाची व्यवस्था महापालिकेकडून केली आहे. त्याठिकाणी विधिवत पूजा करून मूर्ती संकलन करावे, असे आवाहन महापालिका सहाय्यक आयुक्त बाळासाहेब ढवळे पाटील यांनी केले आहे.
गणेशोत्सव व मूर्ती विसर्जन नियोजनाविषयी अधिक माहिती देताना ढवळे पाटील म्हणाले की, येथील हडपसर- मुंढवा क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत असणाऱ्या प्रभाग क्रमांक २२ , २३ , २६ , ४२ व नवीन समाविष्ठ मांजरी बुद्रुक, केशवनगर, साडेसतरानळी व शेवाळेवाडी या ठिकाणी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी ३६ गणपती संकलन केंद्रांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
तसेच निर्माल्य गोळा करण्यासाठी सर्व ३६ ठिकाणी ३.८ टनाचे कंटेनर ठेवण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
गणपती उत्सव कालावधीमध्ये २४७ अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. नागरिकांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी संकलन केंद्रे उभारून पर्यावरण पूरक गणपती विसर्जनाची व्यवस्था करण्यात आलेली असून सदर ठिकाणी मोबाईल शौचालय व्यवस्था, विद्युत व्यवस्था, पाण्याच्या टाक्या, आवश्यक ठिकाणी मंडप व्यवस्था करण्यात आलेली आहे. नागरिकांना जनजागृती करीता स्पीकरद्वारे आवाहन करण्यात येत आहे.
तसेच कार्यालय अंतर्गत असणाऱ्या उदा. ९ घाटांच्या ठिकाणी नदीपात्र , कॅनॉल , तलाव , विहिरी या ठिकाणी पाण्याच्या स्त्रोतात गणपतीचे विसर्जन होणार नाही याकरीता घाटांना बंदिस्त बॅरीगेटिंग व सुरक्षिततेसाठी कर्मचारी व जीवरक्षक यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.