पुणे -हिंजवडी ते चाकण, पिंपरी ते निगडी आणि नाशिक फाटा ते चाकण या विस्तारीत मेट्रो मार्गिकेचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करून राज्य शासनाने केंद्र शासनाकडे मान्यतेसाठी पाठविला आहे. सद्यस्थितीत हा प्रस्ताव केंद्र शासनाच्या विचाराधीन असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली.
मेट्रो मार्गांच्या मंजुरीबाबत आमदार लक्ष्मण जगताप, माधुरी मिसाळ यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी माहिती दिली. पिंपरी चिंचवड शहरातून हिंजवडी येथील आयटी पार्क व चाकण एमआयडीसी परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. “पीएमआरडीए’च्या सर्वंकष आराखड्यामध्ये विविध कॉरिडॉरवर मेट्रो प्रणाली राबविण्याबाबत हिंजवडी ते चाकण अशा एकूण 30.08 किमी अंतरात हा मेट्रो मार्ग विकसित करण्याचे नियोजन आहे का, तसेच पिंपरी चिंचवड मनपाने पिंपरी ते निगडी आणि नाशिक फाटा ते चाकण साधारणत: 18 ते 20 किमी अंतराच्या अशा दोन मार्गांचा सविस्तर प्रकल्प अहवाल डीपीआर तयार करण्याची विनंती महामेट्रोला केली होती का, यावर आमदारांनी प्रश्न विचारला होता.
त्यास उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले, “हिंजवडी ते चाकण, पिंपरी ते निगडी आणि नाशिक फाटा ते चाकण या विस्तारीत मार्गिकेचा डीपीआर राज्य शासनाने 2019 मध्ये मान्यता दिली आहे. हा प्रस्ताव राज्य शासनाने केंद्र शासनाकडे मान्यतेसाठी पाठविला होता. केंद्र शासनाने या प्रस्तावावर काही निरिक्षणे नोंदवून सुधारित डीपीआर सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यास अनुसरून सुधारित प्रकल्प अहवाल राज्य शासनाने 25 फेब्रुवारी 2022 रोजी केंद्र शासनाकडे पाठविला आहे.
तसेच नाशिक फाटा ते चाकण या मार्गावर मेट्रोऐवजी निओ मेट्रोमध्ये रुपांतरीत करून मार्ग कमी करून तो भोसरी ते चाकणपर्यंत करण्याची विनंती महामेट्रोला करण्यात आली होती. त्यानुसार या निओ मेट्रोचा डीपीआर तयार करण्याचे काम प्रगतीपथावर असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.