पुणे -राज्य शासन आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या विद्यमाने मिनी ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन दि.2 ते 12 जानेवारी या कालावधीत श्री शिव छत्रपती स्पोर्टस कॉम्प्लेक्स, बालेवाडी येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेत 39 क्रीडा प्रकारांचा समावेश असून सुमारे 9 हजारांपेक्षा अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत.
या क्रीडा स्पर्धांच्या पूर्वतयारीसाठी विधानभवन येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले, ” या स्पर्धांनिमित्त पुण्याचे क्रीडा वैभव आणि क्रीडा क्षेत्रातील ओळख देशपातळीवर पोहोचविण्याची संधी आहे.’ बैठकीस क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक संघटनेचे सचिव नामदेव शिरगावकर, उपायुक्त नयना बोदार्डे, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, माहिती उपसंचालक डॉ.पुरुषोत्तम पाटोदकर उपस्थित होते.
राव म्हणाले, “महाराष्ट्र ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन पुण्यासाठी गौरवाची बाब आहे. दोन दशकानंतर असे आयोजन पुण्यात होत आहे. यासोबत जी-20 बैठका आणि एटीपी टेनिस स्पर्धेचेदेखील आयोजन नववर्षाच्या सुरुवातीला होत आहे. त्यामुळे तयारीसोबत पुण्याचे ब्रॅंडिंगदेखील करण्यात यावे.
शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना उत्तम क्रीडा कौशल्य पाहण्याची संधी असल्याने त्यांनाही आयोजनात सहभागी करून घ्यावे. स्पर्धेसाठी वाहतुकीचे योग्य नियोजन करावे. त्यासाठी मार्शलची नेमणूक आवश्यक ठिकाणी करण्यात यावी. खेळाडूंना स्पर्धा कालावधीत आवश्यक आरोग्य सुविधा देण्यासाठी पथकांची नेमणूक करण्यात यावी.’
राज्यात क्रीडा वातावरण निर्माण करणे, खेळाला उत्तेजना देणे, खेळाडूंना नैपुण्य दाखवण्याची संधी मिळावी हा या आयोजनामागचा उद्देश आहे. यात जळगाव, नाशिक, नागपूर, मुंबई, बारामती, एमआयटी-पुणे, औरंगाबाद व पूना क्लब येथे प्रत्येकी 1 याप्रमाणे महाराष्ट्रात स्पर्धांचे आयोजन होईल.
– सुहास दिवसे, क्रीडा आयुक्त