सागर येवले
पुणे – महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात विविध उपचार आणि प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना आता “आयसीयू’ची सुविधाही मिळणार आहे. येथे सर्व सुविधांयुक्त असे आठ बेडचे सुसज्ज अतिदक्षता विभाग (आयसीयू) साकारण्यात येत आहे. गर्भावस्थेतील नऊ महिने तपासणी आणि औषधोपचार कमला नेहरू रुग्णालयात, मात्र प्रसूतीसाठी ससून किंवा अन्य रुग्णालायात जावे लागते.
अत्यावश्यक रुग्ण आला तरी त्याला दाखल करून घेतले जात नाही. कारण, प्रसूतीदरम्यान महिलेची प्रकृती बिघडली तर रुग्णालयात “आयसीयू’ उपलब्ध नाही. त्यावेळी होणारी धावपळ आणि महिलेला जीव याचा विचार करून रुग्णालयाच्या दारातूनच महिलेला दुसरीकडे घेऊन जाण्याचे सांगितले जाते. त्यामुळे रुग्ण आणि नातेवाईकांची हेळसांड होते. हे लक्षात घेऊन ग्णालयात 8 बेडच्या अतिदक्षता विभागाला मागीलवर्षी मंजुरी मिळाली. जवळपास कोटी रुपयांच्या निधीतून हा विभाग साकारत असल्याचे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. वैशाली जाधव यांनी सांगितले.
टप्प्याटप्प्याने सुधारणा
कमला नेहरू रुग्णालय हे 1966 मध्ये पुणे महापालिकेच्या ताब्यात आले. त्यानंतर तेथे हळूहळू सुधारणा करण्यात आल्या. येथे स्वतंत्र स्त्री आणि प्रसूतीविभाग सुरू झाला. नवजात बालकांसाठी “एनआयसीयू’ सुरू झाले. मात्र, महिलांसाठी “आयसीयू’ सुविधा नव्हती. आज पहिल्यांदाच हे “आयसीयू’ सुरू होणार आहे.
पाच वर्षांतील प्रसूती संख्या वर्षप्रसूती संख्या
2017-182,686
2018-192,793
2019-203,196
2020-214,500
2021-225,285
हा अतिदक्षता विभाग आठ बेडचा असेल. त्यासाठी भवन आणि विद्युत विभागाकडील सर्व प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, येत्या दहा दिवसांत आयसीयूच्या कामाला सुरुवात होईल. तर पुढील तीन ते चार महिन्यांत आयसीयूचे काम पूर्ण होईल. त्यानंतर स्त्री रुग्ण आणि गर्भवतींना फायदा होईल. त्यांना अत्यावश्यक उपचारदेखील मिळतील. – डॉ. वैशाली जाधव, सहायक आरोग्यप्रमुख, पुणे महापालिका