पिंपरी – गणेशोत्सवानंतर वेध लागतात ते नवरात्रोत्सवाचे. नऊ दिवस या उत्सवता अनेकजण गरबा, दांडियाच्या निमित्ताने मनसोक्त नृत्याची धमाल करतात. त्यासाठी शहरात ठिक-ठिकाणी खास प्रशिक्षण घेतले जाते. त्यामुळे सध्या शहरात गरबा-दांडिचाया “नाद’ घुमत असून प्रशिक्षणाची धूम सुरू आहे.
येत्या रविवारपासून (दि. 15) ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सवास सुरवात होत आहे. नवरात्रोत्सव जवळ आला की, दांडिया, गरबाचे प्रशिक्षण घेणाऱ्यांची गर्दी वाढते. खास गुजराती गरबा, दांडियाचे प्रशिक्षण घेतले जाते. त्यासाठी ग्रुप बनविले जातात. हे ग्रुप ठिकठिकाणी जाऊन आपली कला सादर करत तेथील स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवितात व भरघोस बक्षिसे मिळवितात. त्यामुळे शहरात सध्या चिंचवड, वाल्हेकरवाडी, निगडी आदी परिसरात गरबा नृत्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. 8 ते 15 दिवसांच्या या प्रशिक्षणासाठी अगदी बेसिक नृत्यापासून शिकविले जाते.
अशा प्रशिक्षणास तरुण वर्गाबरोबरच इच्छुक असलेल्या सर्वच वयोगटातील महिला आणि पुरुष सहभागी होत आहेत. दांडिया गरबाच्या वर्गामध्ये प्रशिक्षण घेणारे प्रामुख्याने स्पर्धा, महोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी सराव करीत आहेत. त्यांना पारंपरिक दांडिया, गरबा, राजस्थानी, महाराष्ट्रीयन व नृत्य शिकवले जात आहेत. त्यात सर्वच वयोगटातील महिला, पुरुषांचा सहभाग असल्याचे प्रशिक्षकांनी सांगितले.
गुजराती, महाराष्ट्रीयन नृत्य
दांडिया गरबाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तरुणाईसह ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले नृत्य प्रशिक्षणासाठी येत आहेत. काहीजण ग्रुप करून येत आहेत. 8 जणांचा तसेच 12 ते 14 जणांचे ग्रुप आहेत. किमान 500 रुपयांपासून फि घेतली जात आहे. नवरात्रोत्सवाच्या आधी प्रशिक्षण वर्गांना सुरुवात होते. गुजराती, महाराष्ट्रीय अन् विविध राज्यांतील लोक दांडिया- गराचे प्रशिक्षण घेत आहेत.
नवरात्रोत्सव मंडळांकडून स्पर्धांचे आयोजन
पिंपरी चिंचवड शहरात विविध नवरात्रोत्सव मंडळांकडून दहा दिवस नृत्य, गरबा, दांडिया स्पर्धांचे आयोजन केले जाते. नवरात्रोत्सवात दांडिया, गरबाच्या कार्यक्रमांची शहरात रेलचेल असते. त्यात तरुण-तरुणींसह लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिक सहभागी होतात. शहरात ठिकठिकाणी या स्पर्धा होतात. त्याचीच पूर्व तयारी म्हणून अनेकजण प्रशिक्षण घेताना दिसत आहेत. गेल्या 15 दिवसांपासून हे वर्ग सुरू असून एका ग्रुपमध्ये 8 ते 14 जणांचा समावेश आहे.