कुंभारवाड्यात तोरणा, राजगड, रायगड किल्ल्यांची प्रतिकृतीही उपलब्ध
पुणे – कधी एकदा परीक्षा संपते आणि किल्ले बनवतो, अशी सध्या बालगोपाळांची मानसिक स्थिती झाली आहे. तोरणा, राजगड, रायगड या किल्ल्यांची प्रतिकृती बनविण्याची पूर्वतयारीही मुलांनी केली आहे. परंतु, हल्ली फ्लॅट संस्कृतीमुळे सगळ्यांनाच किल्ले बनविणे शक्य होतेच असे नाही, त्याला लागणारी ऐसपैस जागा आता उपलब्ध होत नाही. त्यामुळे कुंभारवाड्यातून या किल्ल्याची छोटीशी प्रतिकृती आणण्याकडे हल्ली अनेकांचा कल दिसून येतो, हेच तयार साहित्य बाजारात उपलब्ध झाले आहेत.
नवीन कपडे, फराळाचे खुसखुशीत पदार्थ, फटाके याबरोबरच किल्ल्याच्या प्रतिकृती हा देखील मुलांचा जिव्हाळ्याचा विषय असतो. अगदी शोधून विटा आणणे, माती गोळा करणे आणि दगड मातीचे मिश्रण करून किल्ल्याच्या प्रतिकृती अगदी एकत्र गोंगाट करत साकारणे, अशी मजा ही मुले लुटत असतात.
विटकरी रंगासह काळ्या पांढऱ्या पट्ट्यांनी रंगवलेले हे किल्ले आणि त्यावर स्थापन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून ते सरदार, मावळे यांची चित्रे. किल्ल्यांच्या भोवती जंगल आणि त्यातील प्राणी याची देखील चित्रे कुंभारवाड्यातील व्यावसायिकांकडे उपलब्ध आहेत. कुंभारवाडा परिसरात प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये साकारलेल्या विविध आकारातील किल्ल्यांच्या प्रतिकृती तसेच किल्ल्यावरील चित्रे रस्त्याने जाणाऱ्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. उंचीप्रमाणे किल्ल्याची किंमत ठरवली असून एक ते अडीच फुटांपर्यंत तो उपलब्ध असून किंमत 400 रुपयांपासून ते 900 ते एक हजार रुपये अशी आहे.
किल्ल्यांवर मांडण्याची चित्रे…
कुंभारवाड्यात किल्ल्यांवर मांडायची चित्रे डझनावर विक्री केली जातात. यामध्ये सरदार, मावळे, सैनिक, शेतकरी, गवळण, वाद्यवादक कलाकार, तोफा, वाघ, सिंह, हरीण, चित्ता, कुत्रा, अशा चित्रांचा समावेश असतो. छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती स्वतंत्रपणे घ्यावी लागते. 10 इंचापासून ते तीन फूट उंचीच्या, अशा विविध आकारांमध्ये उपलब्ध असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती 60 रुपयांपासून ते 300 रुपये अशा वेगवेगळ्या दरांमध्ये आहे.
++++++++++++