पुणे – महापालिका निवडणुकीतील महिला आरक्षण मंगळवारी जाहीर झाले. यामध्ये सुमारे 23 प्रभागांमध्ये महिलांचे प्राबल्य होणार असून, हे भाग उपनगरांमधील आहेत. त्यामुळे निवडून येणाऱ्या महापालिकेच्या आगामी कार्यकारिणीमध्ये उपनगरांमधून प्रतिनिधित्व करणाऱ्या महिलांची संख्या जास्त असणार आहे.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्वसाधारण महिला गटांची आरक्षणे जाहीर झाली. 87 जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या. त्यातील 12 अनुसूचित जाती, 1 अनुसूचित जमाती, 57 थेट पद्धतीने वाटप केलेल्या सर्वसाधारण म्हणजे खुल्या गटातील जागा, आणि 17 जागा या सर्वसाधारण महिलांसाठी 33 प्रभागांतून चिठ्ठी काढून आरक्षित केलेल्या आहेत. कोथरूडच्या भुसारी कॉलनीपासून ते हडपसर वानवडीपर्यंत बहुतांश उपनगरातील प्रभागातील प्रत्येकी दोन जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत.
यामध्ये अनुसूचित जातींशिवाय, सर्वसाधारण गटातील महिलांचा समावेश आहे. भुसारी कॉलनी, रामनगर-उत्तमनगर शिवणे, कर्वेनगर, महर्षिनगर, रामटेकडी-सय्यदनगर, वानवडी-कौसरबाग, महंमदवाडी-उरुळी देवाची, कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी, अप्पर-सुप्पर, नांदेडसिटी, खडकवासला-नऱ्हे, आंबेगाव पठार,
भारती विद्यापीठ, सुखसागरनगर, टिंगरेनगर, लोहगाव, येरवडा, खराडी-वाघोली, मुंढवा, साडेसतरा नळी, मगरपट्टा, हडपसर येथील प्रभागांमध्ये प्रत्येकी तीन जागांपैकी दोन जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. त्यामुळे 50 पेक्षा जास्त महिला याच भागातून निवडून जाणार आहेत.