तिकीट वाटपात राजकीय पक्षांनाही करावे लागतील जुगाड
पुणे – महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी झालेल्या आरक्षण सोडतीतून 30-35 विद्यमानांना (बरखास्त झालेल्या कार्यकारिणीत होते ते) फटका बसणार हे निश्चित झाले आहे. अनुसूचित जाती महिला आणि सर्वसाधारण आरक्षणामध्ये बदल झाल्याने हे झाले असून, आता तिकीट कोणाला द्यावे, याची रस्सीखेच पक्षाला करावी लागणार आहे, अन्यथा कुटुंबातील सदस्यांसाठी तिकिटाचे जुगाड करावे लागणार आहे.
प्रभागातील सदस्य संख्या चार वरून तीनवर आल्याने आणि त्यातही महिला आरक्षणामुळे काही प्रभागात विद्यमान सदस्यांची एकमेकांविरोधात आणि काहींची उमेदवारी मिळवण्यापासून अंतर्गतच स्पर्धा सुरू होईल असे यावेळच्या सोडतीवरून लक्षात येते.
अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या सध्याची जागा महिलांसाठी आरक्षित झाल्याने प्रदीप गायकवाड, राहुल भंडारे, अविनाश साळवे, ऍड. भय्यासाहेब जाधव, वीरसेन जगताप या नगरसेवकांची संधी धूसर झाली आहे. तर नगरसेविकांच्या जागेवरही अनुसूचित जातीचे खुले आरक्षण पडल्याने सुनीता वाडेकर आणि पल्लवी जावळे यांच्याऐवजी त्यांच्या कुटुंबातून अन्य कोणी उमेदवार येण्याची शक्यता आहे.
अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी दोनच जागा होत्या. यापैकी सन 2017 मध्ये अनुसूचित जमातीसाठीच्या महिला जागेवर निवडून आलेल्या राजश्री काळे यांच्या प्रभागातील आरक्षणच गेले आहे. तर प्रभाग क्र. 1 मधून अनुसूचित जमातीच्या खुल्या जागेवर निवडून आलेले मारूती सांगडे यांच्या प्रभागामध्ये अनुसूचित जमातीतील महिलेसाठी आरक्षण पडले आहे. त्यामुळे काळे आणि सांगडे यांच्यात स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यांना पक्ष उमेदवारी देईल की नवा चेहरा दिसेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
येथे विद्यमान एकमेकांविरोधात लढण्याची शक्यता
* प्रभाग क्र. 1 धानोरीमध्ये एकच जागा सर्वसाधारण असून, भाजपचे बॉबी टिंगरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या रेखा टिंगरे या दोघांपैकी एकांनाच संधी मिळण्याची शक्यता आहे.
* प्रभाग क्र. 21 कोरेगाव पार्क- मुंढवा या प्रभागामध्ये एकच जागा सर्वसाधारण महिलेसाठी असल्याने भाजपच्या मंगला मंत्री आणि लता धायरकर यांच्यापैकी एकालाच रिंगणात संधी मिळणार आहे.
* प्रभाग क्र. 27 कासेवाडी- लोहियानगरमध्येही एकच जागा महिलेसाठी आरक्षित असल्याने भाजपच्या अर्चना पाटील आणि मनीषा लडकत या दोघींपैकी एकीलाच संधी मिळण्याची शक्यता आहे. किंवा अन्य कोणाला संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
* प्रभाग क्र. 37 जनता वसाहत-दत्तवाडी मध्ये एकच जागा महिलांसाठी राखीव असल्याने प्रिया गदादे आणि अनिता कदम यांची समोरासमोर लढत होण्याची शक्यता आहे.
* प्रभाग क्र. 41 कोंढवा खुर्द- मीठानगर मध्ये एकच जागा महिलांसाठी खुली असल्याने परवीन हाजी फिरोज आणि हमीदा सुंडके यांच्या पैकी एका सदस्याला घरी बसावे लागणार असून, खुल्या जागेवर कुटुंबातील पुरुष सदस्याला संधी मिळण्याची शक्यता आहे. सर्वसाधारण गटात हाजी गफूर पठाण आणि साईनाथ बाबर हे दोघे समोरासमोर येण्याची शक्यता आहे.
* प्रभाग क्र. 47 कोंढवा बु.- येवलेवाडीमध्येही विद्यमान सदस्य संगीता ठोसर आणि वृषाली कामठे यांच्यामध्ये लढत होऊ शकते.
* प्रभाग क्र. 49 बालाजीनगर- शंकर महाराज मठ प्रभागात विद्यमान नगरसेवक दत्तात्रय धनकवडे आणि राजेंद्र शिळीमकर हे समोरासमोर येण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी थेट लढत टाळण्यासाठी कुटुंबातील महिला अथवा पुरूष सदस्यही ऐनवेळी मैदानात येण्याची शक्यता असल्याने आगामी महापालिकेच्या सभागृहामध्ये किमान 50 नवीन चेहेरे दिसतील, असे किमान या आरक्षण सोडतीवरून दिसत आहे.