पुणे: अतिक्रमणविरोधी पथकासोबत कारवाई करताना राग आल्यामुळे एका भाजी विक्रेत्याने पोलीस उपनिरीक्षकाच्या हाताच्या करंगळीचा चावा घेतला. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आले आहे. ही घटना बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास हडपसर येथील हांडेवाडी रस्त्यावर घडली.
नईम चुन्नूमिया सौदागर (वय 47, रा. सैय्यदनगर, हडपसर ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी वाहतूक पोलिस निरीक्षक अशोक शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकासोबत वाहतूक पोलिस निरीक्षक अशोक शिंदे कर्मचाछयांसह कारवाई करीत होते.
त्यावेळी रस्त्याच्या कडेला भाजीपाला विक्री करणाऱ्या नईमला पोलिसांनी बाजूला होण्यास सांगितले. त्यावेळी त्याने पोलिसांना मी भाजीची पथारी उचलणार नाही, तुम्हाला काय करायचे ते करा असे म्हणत शिंदे यांच्या अंगावर धावला. त्यानंतर त्याने शिंदे यांच्या हाताच्या करंगळीचा चावा घेउन जखमी केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अभिजीत जोगदंड अधिक तपास करीत आहेत.