पिंपरी – शहरातून करोना हद्दपार व्हावा, यासाठी आमचे आई-बाबा रस्त्यावर उतरून तुमचे करोनापासून रक्षण करण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्ही घरी राहून त्यांना सहकार्य करा. जेणेकरून हे युद्ध लवकर संपेल आणि आमचे आई-बाबाही घरी सुखरूप येतील, अशा भावनिक साद पोलिसांच्या मुलांकडून नागरिकांना घातली जात आहे.
गेल्या वर्षभरात करोनामुळे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 810 पोलीस कर्मचारी आणि अधिकारी करोनाबाधित झाले आहेत. सध्या 60 पोलीस कर्मचारी करोना बधित असून त्यापैकी 10 जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर करोनामुळे आतापर्यंत चार पोलिसांचा मृत्यू झाला आहे. कावेरीनगर-वाकड, इंद्रायणीनगर-भोसरी, आणि पिंपरी या मोठ्या पोलीस वसाहती असून यांत शेकडो पोलीस कुटुंबीय वास्तव्यास आहेत.
करोनासंदर्भात लागू करण्यात आलेल्या आदेशांची अंमलबजावणी, नाकाबंदी, वाहन तपासणी, बंदोबस्त, त्यात करोना रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्था, चाचणीसाठी आलेल्या किंवा संसर्ग झालेल्या रुग्णांची, नातेवाइकांची नोंदणी, रुग्णाचा मृत्यू झाल्यास पंचनाम्यापासून अंत्यविधीपर्यंतची जबाबदारी, विलगीकरण, लसीकरण केंद्रांबाहेरील बंदोबस्त, होम क्वॉरंटाइन व्यक्तीची माहिती घेणे, तसेच विविध बंदोबस्ताची जबाबदारी पोलिसांच्या खांद्यावर आहे.
आपल्यामुळे आपल्या कुटुंबाला करोनाची बाधा होऊ नये म्हणून ते स्वतःला कुटुंबापासून दूर ठेवत आहेत. अनलॉकच्या काळात पोलिसांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र या काळातही गुन्हेगारी वाढत्याने त्यात त्यांना लक्ष घालावे लागले. आता पुन्हा करोना बाधितांची संख्या वाढू लागल्याने जैसे थे परिस्थिती झाली आहे. आपल्या पोलीस बाबा किंवा आईला या आजाराची लागण तर होणार नाही ना ? अशी भीती मुलांना आहे. पोलीस कुटुंबीय सतत या दहशतीखाली जगत आहेत.
करोनामुळे पोलीस मुलांपासून दूर
बाबाची भेट होत नाही. ते माझ्यासोबत खेळतही नाही. मी त्यांची वाट बघून झोपून जाते. अशात मी झोपल्यावर ते येतात आणि मी झोपेतून उठेपर्यंत परत कामावर गेलेले असतात.
-संस्कृती संतोष पाटील
आम्हाला काही होऊ नये म्हणून आमचे बाबा आमची खूप काळजी घेतात. माझ्यासारखी अन्य मुले आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी ते लढताहेत. तुम्हीही घरी राहून त्याला मदत करा. म्हणजे माझे बाबा पूर्वीप्रमाणेच आम्हाला भेटू शकतील.
-प्राजक्ता सतीश कांबळे
बाबासारखे अनेक जण जीव धोक्यात घालून कार्यरत आहेत. गेले कित्येक महिने आम्ही भेटलो नाही. नागरिकांनी त्याला घरात राहून सहकार्य करणे गरजेचे आहे. आम्हालाही आमच्या बाबांसोबत मस्ती करायची आहे.
– अथर्व संतोष बर्गे
आम्हाला काही होऊ नये म्हणून बाबा घरी आल्यावरही आमच्यापासून लांबच राहतात. त्यांचा मुलगा असल्याचा गर्व वाटतो आणि त्यांची काळजीही वाटते. नागरिक नियमांचे पालन करत नाही. नागरिकांनी घरात राहून सहकार्य करणे गरजेचे आहे.
– ओमकार विठ्ठल बढे