अहमदाबाद – नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर पार पडलेल्या दिल्ली विरुद्ध बंगळुरू या सामन्यात बंगळुरूने दिल्लीवर एका धावेने निसटता विजय मिळवला. दिल्लीनेही बंगळुरूला तोडीत तोड उत्तर दिले. दिल्लीच्या हातातोंडाशी आलेला घास मोहम्मद सिराजने हिरावून नेला. परंतु बंगळुरूच्या विजयाचा पाया ए बी डिव्हिलियर्सने रचला. त्याने दिल्लीविरोधात केवळ 42 चेंडूत 75 धावांची धमाकेदार खेळी केली. त्याच्या खेळीमुळेच बंगळुरूला 171 धावा करता आल्या; मॅचही जिंकता आली.
मॅचनंतर कर्णधार विराट कोहलीने ए बी डिव्हिलियर्सच्या खेळीचं तोंडभरून कौतुक केलं. “असं वाटतंच नाही की डिव्हिलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीय. त्याची आजची खेळी पुन्हा पुन्हा पाहण्यासारखी आहे’, अशा शब्दांत त्याने डिव्हिलियर्सवर स्तुतिसुमने उधळली.
डिव्हिलियर्सला मी हे सांगितलेलं आवडणार नाही.
पण मागील पाच महिन्यांपासून त्याने कोणतेही स्पर्धात्मक क्रिकेट खेळलेले नाही. असं वाटतंच नाही की डिव्हिलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीय. त्याची आजची खेळी पुन:पुन्हा पाहण्यासारखी आहे. त्याच्या खेळीला माझा सलाम अशीच बॅटिंग त्याने करत राहो, अशा शब्दांत त्याने डिव्हिलियर्सची स्तुती केली.
रॉयल्स चॅलेजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या सामन्यात डिव्हिलियर्सने केवळ 42 चेंडूत 75 धावांची शानदार खेळी केली. या खेळीत त्याने 3 चौकार आणि 5 उत्तुंग षटकार लगावले. त्यामुळे बंगळुरूला 172 धावा करता आल्या.
डिव्हिलियर्सने आयपीएलमधील 5000 धावांचा टप्पा पूर्ण केला. अशी कामगिरी करणारा तो दुसरा परदेशी खेळाडू ठरला आहे. याअगोदर हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने 5000 धावा केल्या आहेत. आता संपूर्ण स्पर्धेत डिव्हिलियर्स आणि वॉर्नरच्या कामगिरीकडे लक्ष असेल.