भिगवण – येथील रिलायन्स व तोफखाना क्रिकेट क्लबच्या वतीने शिवजयंतीनिमित्त स्व. रमेशराव जाधव यांच्या स्मरणार्थ क्रिकेट स्पर्धेमध्ये अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यांत पुणे पोलीस संघाने हराळवाडी क्रिकेट संघावर 10 धावांनी मात करत स्व. रमेशराव जाधव चषक पटकाविला.
स्पर्धेचे उद्घाटन बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे व नीराभीमाचे संचालक राजवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये राज्यभरातील 16 संघ सहभागी झाले होते. अंतिम सामना पुणे पोलीस संघ व हराळवाडी क्रिकेट संघादरम्यान खेळला गेला. अटीतटीच्या सामन्यात पुणे पोलीस संघाने विजयश्री खेचून आणत 71 हजार रुपयांसह स्व. रमेशराव जाधव चषक पटकावला. हराळवाडी संघ उपविजेता, प्रदीप स्पोर्ट मुंबई संघाने तृतीय तर स्मार्ट हार्ड संघ पुणे यांनी चुतर्थ क्रमांक पटकावला.
मॅन ऑफ द सिरीज अमर साळवे, उत्कृष्ट फलंदाज ईश्वर पतंगे, उत्कृष्ट गोलंदाज लखन गावडे, उत्कृष्ट यष्टीरक्षक मनोज चव्हाण, प्रथम अर्धशतक अमर साळवे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक प्रशांत गायकवाड यांना यावेळी गौरविण्यात आले. विजेत्या संघास पराग जाधव यांच्यावतीने 71 हजार रुपये व चषक, उपविजेत्या संघास जिजाऊ महिला फेडरेशनच्यावतीने 51 हजार व चषक, तृतीय क्रमांकाच्या संघास बापुराव थोरात यांच्यावतीने 31 हजार व चषक तर चतुर्थ क्रमांक पिंटु गुदेंचा यांच्यावतीने 21 हजार व चषक प्रदान करण्यात आला.
विजेत्या संघास माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे हस्ते स्व. रमेशराव जाधव चषक व 71 हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व सामन्यांचे समालोचन देवानंद शेलार यांनी केले. स्पर्धेचे संयोजन पंचायत समितीचे उपसभापती संजय देहाडे, भाऊसाहेब वाकळे, भारत गायकवाड, राजु देहाडे, भाऊसाहेब भरणे, रवींद्र शिंदे, गणेश शेलार, दादा शेलार यांनी केले.