कात्रज -कात्रज उद्यानातील फुलराणी गेल्या पाच वर्षांपासून बंद होती. ती सुरू करण्याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे यांनी पुढाकार घेतल्याने ही फुलराणी पुन्हा धावणार आहे. गुरूवारी (दि.26) प्रजासत्ताक दिनापासून बालचमुंसाठी ही फुलराणी सुरू करण्याचा निर्धार वसंत मोरे यांनी व्यक्त केला होता. त्यानुसार फुलराणीची कामे वेगाने करण्यात आली. यामुळेच एकदा ठरविले ना की मी काम पूर्ण करतोच, अशी पोस्ट सोशल मीडियावर टाकत मोरे यांनी विरोधकांना चिमटा काढला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते, माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी कात्रज येथील आजी-आजोबा उद्यानात फुलराणी सुरू केली होती. फुलराणी सुरू झाल्यानंतर पहिल्याच वर्षी या उपक्रमांतून वार्षिक तब्बल 29 लाखांचे विक्रमी उत्पन्न महापालिकेला मिळाले होते. 2017च्या महापालिका निवडणुकीसाठी प्रभागांची फेररचना करण्यात आल्याने वसंत मोरे यांचा प्रभाग बदलला होता, त्यानंतर कात्रज उद्यानात बालचमुंसाठी सुरू केलेल्या फुलराणीकडेच्या देखभाल दुरूस्तीकडे राजकीय हेतुतून दुर्लक्ष करण्यात आले.
यातून पाच वर्षांच्या कालावधीत फुलराणीच्या रूळांची दुरवस्था झाली, तसेच फुलराणी गाडी जागेवरच उभी राहून ती बंद पडली. ही फुलराणी सुरू करण्यासाठी मनसेकडून सातत्याने आंदोलने करण्यात येत होती. पालिकेच्या सभागृहाची मुदत संपुष्टात आल्यानंतर कारभार प्रशासकांच्या हाती आला. फुलराणी पुन्हा सुरू करण्यासाठी वसंत मोरे यांनी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला, त्यानुसार फुलराणीच्या दुरूस्तीची कामे व्हेइकल डेपो विभागाकडून सुरू करण्यात आली. आता, फुलराणी पुन्हा एकदा धावण्यास सज्ज झाली आहे. दि. 26 जानेवारीपासून फुलराणी सुरू करण्यात येणार आहे.
फुलराणीच्या रूळाखाली असलेल्या लाकडाला वाळवी लागल्याची पोस्टही टाकली होती. ही सर्व कामे पूर्ण झाली आहेत. पाच वर्ष धूळखात पडून असलेली फुलराणी नव्या दमात सुरू होईल. एकदा ठरविले ना, की मी काम पूर्ण करतोच.
– वसंत मोरे, माजी नगरसेवक, मनसे, कात्रज