पुणे – पुणे रेल्वे विभागात डिसेंबर २०२३ मध्ये तिकीट तपासणीदरम्यान १६ हजार २२ प्रवासी विना तिकीट प्रवास करताना आढळून आले आहेत. पुणे विभागाने कारवाई करत त्यांच्याकडून १ कोटी १८ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर ५ हजार ३०८ प्रवाशांना अनियमित प्रवासासाठी ३७ लाख ३५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच बुकिंग न करता तसेच जड साहित्य घेऊन जाणाऱ्या १९९ प्रवाशांकडून २५ हजार ७५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांच्या समन्वयाने तिकीट निरीक्षक आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक दंड वसूल करणाऱ्या तिकीट परीक्षक नितीन तेलंग आणि वरिष्ठ तिकीट परीक्षक रुपाली माळवे यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डाॅ. रामदास भिसे, मुख्य तिकीट तपासणी अधिकारी प्रवीण होनराव आणि अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, अशा प्रकारे तिकीट तपासणी मोहीम रेल्वे प्रशासनाकडून सातत्याने सुरू असून प्रवाशांनी योग्य तिकीट घेऊनच प्रवास करावा. अन्यथा रेल्वे कायद्यांतर्गत दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते, असे डाॅ. मिलिंद हिरवे यांनी सांगितले.