हडपसर – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिड वर्षांपासून महापालिकेचे कै. खासदार आण्णासाहेब मगर हॉस्पिटल अमर कॉटेज येथे सुरू आहे. मगरपट्टा चौकातून हे हॉस्पिटल येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. मात्र, पुन्हा एकदा मगरपट्टा चौकात असलेल्या हॉस्पिटलमध्ये सर्व रुग्णसेवा पूर्ववत सुरू होत आहेत. सध्या साहित्याचे शिफ्टिंग सुरू असून मंगळवारपासून (दि.२१) येथे मगर हॉस्पिटलची रुग्णसेवा पूर्ववत सुरू केली जात आहे. अशी माहिती माजी नगरसेविका हेमलता निलेश मगर यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमर कॉटेज येथे स्थलांतरित केलेले येथील पूर्वीचे हॉस्पिटल रूग्णांना अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे मगरपट्टा चौकातील हे हॉस्पिटल पुन्हा सामान्य रूग्णांसाठी सुरू करण्याची मागणी रूग्णांकडून होत आहे. त्यासाठी आरोग्य विभागाकडे पाठपुरावा करून हे हॉस्पिटल पूर्वीच्या जागेत पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली होती, त्यानुसार आजपासून अमर कॉटेज येथील स्थलांतरित रुग्णालयातील साहित्य पुन्हा मगरपट्टा चौकातील मगर हॉस्पिटलमध्ये शिफ्टिंग करण्यात येत आहे.
पुढील दोन दिवस हे साहित्य शिफ्ट करून झाले की मंगळवारी ( दि.२१ ) मगरपट्टा चौकातील कै. खासदार आण्णासाहेब मगर हॉस्पिटलमध्ये सर्व रुग्णसेवा पूर्ववत सुरू होतील.असेही हेमलता मगर यांनी यावेळी सांगितले.अमरकॉटेज येथे स्थलांतरित करण्यात आलेले रूग्णालय मगरपट्टा चौकातून सुमारे एक किलोमीटर अंतरिवर आहे. त्याठिकाणी सार्वजनिक वाहतुकीची सोय नसल्याने उपचारासाठी जाऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना दूरवर पायी अथवा भाड्याच्या रिक्षाने प्रवास करावा लागत आहे. अनेक रूग्णांना ते सापडतही नाही. रूग्णालयाच्या पत्त्यावर पोहचण्यासाठी मोठी दमछाक होत आहे. त्यामुळे अनेकांना खाजगी व जवळच्या रूग्णालयात जाऊन पैसे मोजून उपचार घ्यावे लागत आहेत.
“कोव्हीड रूग्णालय सुरू व्हावे म्हणून आम्ही पाठपुरावा केला होता. पालिकेने कोट्यावधी रूपये उभारून अत्याधुनिक यंत्रणा येथे दिली आहे. ही यंत्रणा इतर रूग्णांसाठी उपयोगात येण्यासाठी स्थलांतरित केलेले अमर कॉटेज येथील रूग्णालय पुन्हा मगरपट्टा चौकात पूर्वीच्या ठिकाणी आणण्यात यावे यासाठीही पाठपुरावा केला होता . पालिकेच्या आरोग्य विभागाने त्याची दखल घेऊन मगर हॉस्पिटल पुन्हा मूळ इमारतीमध्ये सुरू होत आहे.पालखी सोहळा हडपसरमध्ये येण्यापूर्वी येथे सर्व रुग्णसेवा सुरू होतील. – हेमलता निलेश मगर (माजी नगरसेविका)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मगरपट्टा चौकातील मगर रुग्णालय अमर कॉटेज येथे स्थलांतरित करण्यात आले होते. आता पुन्हा येथील साहित्य मगरपट्टा चौकातील मगर रुग्णालयात शिफ्टिंग करण्यात येत आहे. साहित्य शिफ्टिंगचे काम झाल्यानंतर पालखी सोहळा हडपसरमध्ये येण्यापूर्वी हे रुग्णालय पुन्हा येथून पूर्ववत सुरू होईल. – डॉ. स्नेहल काळे (वैद्यकीय अधिकारी, महापालिका हडपसर)