पुणे –बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) रिक्त राहिलेल्या प्रवेशांच्या जागांवर सहा दिवसांत प्रतीक्षा यादीतून केवळ 3 हजार 43 बालकांचे प्रत्यक्ष शाळांमध्ये प्रवेश निश्चित झाले. पालकांकडून या प्रवेशासाठीही पाठ फिरविण्यात आली आहे.
“आरटीई’अंतर्गत राज्यातील 9 हजार 86 शाळांची नोंदणी झाली आहे. यात 1 लाख 1 हजार 906 प्रवेशाच्या जागा दर्शविल्या आहेत. यासाठी 2 लाख 82 हजार 783 बालकांचे ऑनलाइन अर्ज दाखल झाले. लॉटरीद्वारे 90 हजार 685 बालकांची निवड झाली. यात 62 हजार 933 बालकांच्या कागदपत्रांची पडताळणी करून शाळांमध्ये प्रवेश झाले. रिक्त जागांवरील प्रवेशासाठी प्रतीक्षा यादीतून पहिल्या टप्प्यात 17 हजार 639 बालकांना संधी देण्यात आली. 19 मेपासून यांची प्रवेश प्रक्रिया सुरू असून 27 मेपर्यंत ही प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे.
जिल्ह्यातील प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होणार
पुणे जिल्ह्यात 957 शाळांमधून 15 हजार 126 प्रवेशाच्या जागा उपलब्ध झाल्या होत्या. यासाठी 62 हजार 960 अर्ज दाखल झाले होते. त्यातून लॉटरीद्वारे 14 हजार 958 बालकांची निवड झाली. मात्र प्रत्यक्षात 10 हजार 321 बालकांचेच प्रवेश झाले आहेत. पुणे जिल्ह्यासाठी प्रतीक्षा यादीतील बालकांसाठीची प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. ही प्रवेश प्रक्रिया लवकर सुरू करावी, अशी मागणीही पालकांकडून होत आहे. “आरटीई’अंतर्गत नामांकित व सोयीची शाळा न मिळाल्यामुळे पालकांनी अन्य शाळांमध्ये प्रवेश घेवून ठेवले आहेत. त्यामुळे या पालकांनी “आरटीई’ प्रवेश घेण्यासाठी निरुत्साह दाखविला आहे.