– दीपक केसरकर यांच्याकडून राष्ट्रीय बालवैज्ञानिक प्रदर्शनस्थळाची पाहणी
पुणे – महाराष्ट्राची सांस्कृतिक विविधता ही सर्वांच्या उत्सुकतेचा आणि आकर्षणाचा विषय आहे. त्यामुळे राज्याच्या संस्कृतीचे दर्शन ५० व्या राष्ट्रीय बालवैज्ञानिक प्रदर्शातून घडले पाहिजे. महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडविणारे उपक्रम प्रदर्शनस्थळी आयोजित करावेत, अशा सूचना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिल्या आहेत्.
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांच्यामार्फत चक्राकार पद्धतीने मुलांसाठी राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार ५० व्या प्रदर्शनाचे यजमानपद महाराष्ट्राला मिळाले आहे. नवी दिल्ली येथील राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद व महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने २६ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात राष्ट्रीय बालवैज्ञानिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे.
दीपक केसरकर यांनी प्रदर्शनस्थळाची पाहणी करुन पूर्वतयारीचा आढावा घेतला. यावेळी शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक अमोल येडगे, सहसंचालक रमाकांत काठमोरे, उपसंचालक डॉ.कमलादेवी आवटे, डॉ. नेहा बेलसरे आदी उपस्थित होते.
शालेय वयातच विज्ञान विषयाची गोडी लागावी व वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण व्हावा या हेतूने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. वय वर्षे १४ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांना आपली सृजनशीलता दाखवण्यासाठी बाल वैज्ञानिक प्रदर्शनीच्या माध्यमातून एक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
या प्रदर्शनामध्ये विविध व्यवस्थापनाच्या शाळा सहभागी होणार आहे. राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनामधून राष्ट्रीय स्तरावर पात्र झालेले विद्यार्थी सहभागी होणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यातून शालेय विद्यार्थी राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाला भेट देणार आहे.
या प्रदर्शनात २२५ दालनाची उभारणी केली जाणार केली आहे. विज्ञानविषयक उत्कृष्ट कार्य करणाऱ्या राज्यातील शासकीय व अशासकीय संस्थांचे दालन, महाराष्ट्राची संस्कृती, पारंपरिक खेळणी आदी विषयांचे नावीन्यपूर्ण दालन या बालवैज्ञानिक प्रदर्शनाचे वैशिष्ट्य राहणार आहे. विविध सांस्कृतिक कलागुणाचे सादरीकरण, विविध मार्गदर्शनपर व्याख्यानांचेही आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अमोल येडगे यांनी दिली आहे.