पुणे- एका 46 वर्षीय व्यक्तीचा रक्तदाब वाढल्याने मेंदू मृत झाला. त्यांना 15 सप्टेंबर रोजी नगर रस्त्यावरील सह्य्राद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, ते उपचारांना प्रतिसाद देत नव्हते. तसेच त्यांचा मेंदू मृत झाल्याने त्यांच्या अवयवदानाचा निर्णय नातेवाईकांनी घेतला आणि पुण्यातील या वर्षातील हे 27 वे अवयवदान झाले.
या व्यक्तीचे हृदय, फुफ्फुसे, किडनी आणि यकृताचे दान करण्यात आले. यातील एक किडनी कर्वे रस्त्यावरील सह्याद्री रुग्णालयात, एक किडणी आणि यकृत नगर रस्त्यावरील सह्याद्री रुग्णालयात प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांना देण्यात आली. तर फुफ्फुस रोपण शस्त्रक्रिया पुण्यात होत नसल्याने दोन्ही फुफ्फुसे सिकंदराबाद येथील केआयएमएस रुग्णालयात पाठवण्यात आली.
याशिवाय हृदयाचे प्रत्यारोपण पुण्यातच डी. वाय. पाटील रुग्णालयातील रुग्णाला देण्यात आले असून, ग्रीन कॉरिडॉर करून हे हृदय नगर रस्त्यावरील सह्याद्री रुग्णालयातून, पिंपरी येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात पाठवण्यात आल्याचे, समन्वयक अमन बेले यांनी सांगितले.
या दात्याच्या कुटुंबियांना अवयवदानाविषयी माहिती होती. त्यांना याबाबत काऊन्सलिंग केले असता, ते यासाठी तयार झाले आणि त्यांनी अवयवदानाची प्रक्रिया पूर्ण केली.