पुणे – पवित्र पोर्टलद्वारे होणाऱ्या शिक्षक भरती प्रक्रियेला लोकसभा आचारसंहिता लागू झाल्यामुळे निर्बंध आले होते. आता निवडणूक आयोगाने या भरतीस परवानगी दिली आहे.
पवित्र पोर्टलमार्फत २५ फेब्रुवारी २०२४ रोजी गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची निवडीसाठी शिफारस असलेली सर्व साधारण गुणवत्ता यादी व्यवस्थापन, जाहिरात निहाय प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी करून समुपदेशनाद्वारे नियुक्ती प्रक्रिया त्या त्या नियुक्ती प्राधिकारी स्तरावर सुरू करण्यात आली होती. दरम्यान, केेंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा २०२४ निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला व आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली.
आचारसंहिता कालावधीत नियुक्ती संदर्भातील कार्यवाहीवर निर्बंध आले. याविषयीची तातडी तसेच न्यायालयीन आदेश विचारात घेता नियुक्ती प्रक्रिया सुरू ठेवण्यास परवानगी मिळण्यासाठी शिक्षण आयुक्त कार्यालयाने शासनामार्फत केेंद्रीय निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव सादर केला. यासंदर्भात निवडणूक आयोगाने नियुक्तीस शिफारस झालेल्या ठिकाणची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियुक्ती संदर्भात कार्यवाही करण्यास परवानगी दिली आहे. याबाबतचे पत्र शिक्षण आयुक्त कार्यालयास प्राप्त झाले आहे. त्यानुसार नियुक्ती प्राधिकारी यांना कार्यवाही करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहे.
“शिक्षक भरतीतील नियुक्ती प्रक्रिया सुरू ठेवण्यास निवडणूक आयोगाची परवानगी प्राप्त झाली आहे. त्या त्या जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली की त्या जिह्यात नियुक्ती संदर्भात कार्यवाही करण्यात येईल” – सूरज मांढरे, शिक्षण आयुक्त