पुणे – व्यावसायासाठी हातऊसने घेतलेले पैसे परत न दिल्याने अपहरण केल्याप्रकरणात एकाला अटकपूर्व जामीन सत्र न्यायाधीश पी.पी.जाधव यांनी मंजुर केला आहे. सुनील छजलानी असे त्याचे नाव आहे. त्याने ऍड. अभिजित जयस्वाल यांच्यामार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.
सुनील यांचा पुत्र सनी सुनील छजलानी (वय 31, रा. केशवनगर, मुंढवा) आणि सलमान ऊर्फ उमरफारूख समीर जमादार (वय 24, रा. अप्पर इंदिरानगर) या दोघांना या प्रकरणात सिंहगड रोड पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. याबाबत राहुल चव्हाण (वय 31, रा. मोशी,आळंदी) याने फिर्याद दिली आहे. ही घटना 10 ते 14 जानेवारी या कालावधीत घडली.
फिर्यादी आणि त्याच्या भावाने छजलानी व्यवसायासाठी पैसे घेतले होते. हे पैसे न दिल्याने 10 जानेवारी रोजी सिंहगड रोड कॉलेज कॅम्पस जवळील क्युबाना कॅफेजवळून फिर्यादीचे अपहरण करण्यात आले. मारहाण करून पैसे न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देत 14 जानेवारी रोजी फिर्यादीला सोडून देण्यात आले.