पुणे – राज्याचे उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑफलाइन म्हणजेच लेखी पद्धतीने होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिकार मंडळाने आगामी होणाऱ्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. अखेर विद्यापीठाकडून ऑफलाइन परीक्षा पद्धतीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
पुणे विद्यापीठ व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची पुढची सत्र परीक्षा जून महिन्यात घेण्याचे नियोजन आहे. या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होतील. या परीक्षेबाबत वेळापत्रक, मार्गदर्शक सूचना, परीक्षेसंबंधित माहिती वेळोवेळी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने गुरुवारी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले. त्यामुळे आता घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने परीक्षा न देता महाविद्यालयात प्रत्यक्षपणे परीक्षा द्यावी लागेल. आता मात्र विद्यार्थ्यांना अभ्यासाची तयारी करणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
करोनामुळे जवळपास दोन वर्षे राज्यातील विद्यापीठे, महाविद्यालये बंद होती. या काळात विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाइन पद्धतीने झाले. या पार्श्वभूमीवर सत्र परीक्षा ऑनलाइन पद्धतीने झाल्या. विद्यार्थ्यांना या परीक्षा घरबसल्या देण्याची मुभा होती. त्यात अनेक सामूहिक पद्धतीने गैरप्रकार होत असल्याचे निदर्शनास आले. विद्यापीठाच्या परीक्षेच्या दर्जा आणि गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत होती. हा सर्व प्रकार थांबविण्यासाठी आणि परीक्षांचा दर्जा टिकवण्यासाठी आगामी सत्र परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय पुणे विद्यापीठाने घेतला आहे. याबाबतचे परिपत्रक परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी गुरुवारी प्रसिद्ध केले. त्यानुसार विद्यापीठात तसेच संलग्न महाविद्यालयातील पदवी, पदविका, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रथम ते अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षा परीक्षा केंद्रांवर होणार आहेत.