कोथरूड – बांधकाम साइटला लावलेली कापडी जाळी, पडदे किंवा होर्डिंगवर लावलेले फ्लेक्स कधी फाटून खाली पडतील सांगू शकत नाही. मात्र, हे फ्लेक्स अपघाताला निमित्त ठरत आहेत, अशीच स्थिती पौड रस्त्यावरील वनाझ कॉर्नरच्या चौकात झाली आहे. मागील 15 दिवसांपासून केबलवर लटकलेला फ्लेस प्रशासनाच्या अद्याप निदर्शनास आलेला नाही, त्यामुळे तो वाऱ्याने खालीपडून अपघात झाल्यावर हा फ्लेक्स काढणार का, अशी शंका उपस्थित केली जात आहे.
वनाज कॉर्नरच्या चौकात मेट्रो पुलाखालून अनेक केबल लटकत आहेत. या केबलवर मागील 15 दिवसांपासून जुना आणि फाटलेला फ्लेक्स लटकत आहे. या चौकातून दररोज हजारो वाहने आणि नागरिक ये-जा करीत असतात. चौकात सिग्नलला उभे राहिल्यावर हा फ्लेक्स निदर्शनास येतो. महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारीही दररोज या चौकातून प्रवास करतात मात्र प्रशासनाला कधीही हा फ्लेक्स धोकादायक ठरू शकतो, असे वाटत नाही. फ्लेक्स खाली पडून किंवा केबळ तुटल्यावर होणाऱ्या अपघाताला जबाबदार कोण? त्यानंतर कारवाई करून काय उपयोग. हा फ्लेक्स तत्काळ काढून अपघाताचा धोका टाळावा, अशी मागणी ऍड. शिवाजी भोईटे यांनी केली आहे.
अधिकाऱ्यांकडून “संशोधन’?
फ्लेक्स कुणाचा, कोणी लावला तेथे कसा आला याचे असे “संशोधन’ क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी बंद करावे आणि हा जिवघेणा फ्लेक्स काढून रस्ता सुरक्षित करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांसह वाहनचालकांकडून होत आहे.