सातारा – खटाव तालुक्यातील वडूज येथील पंचायत समितीचा विस्तार अधिकारी 12 हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. तक्रारदार ग्रामसेवक याच्याकडे कारणे दाखवा नोटिसीच्या अनुषंगाने कारवाई न करण्यासाठी लाच घेताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. संजय विलासराव सोनावले (वय 56, रा. सातारा, मूळ रा. पाली, ता. कराड) असे त्या विस्तार अधिकाऱ्याचे नाव आहे.
याबाबतची माहिती अशी, की तक्रारदार हा ग्रामसेवक असून वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लोकसेवक संजय सोनावले हा तक्रारदाराच्या कार्यालयीन कामकाजामध्ये क्षुल्लक चुका काढून तक्रारदाराचा मानसिक छळ करीत असत. तसेच तक्रारदारास वरिष्ठांना कसूर अहवाल पाठवेन, तुला निलंबित करेन अशा धमक्याही देत असे. दरम्यान, एका प्रकरणामध्ये तक्रारदार यास लोकसेवक यांनी कारणे दाखवा नोटीस दिली होती. सदरच्या कारणे दाखवा नोटिसीच्या अनुषंगाने तक्रारदारांवर कारवाई न करण्यासाठी लोकसेवक सोनावले याने संबंधिताकडे दि. 25 रोजी पडताळणी दरम्यान 12 हजार रुपये लाच मागितली आणि ती स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभाग सातारा यांनी सापळा रचून त्याला रंगेहाथ ताब्यात घेतले.
पुण्याचे पोलीस अधिक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली साताऱ्याचे पोलीस उपअधीक्षक उज्वल वैद्य, पोलीस हवालदार प्रशांत नलावडे, पोलीस कॉन्स्टेबल तुषार भोसले, पोलीस हवालदार निलेश चव्हाण, मारुती अडागळे यांनी ही कारवाई केली. या घटनेमुळे खटाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.