पुणे- शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रमुख रस्त्यांवर स्मार्ट सिटीअंतर्गत 110 प्रमुख चौकांमध्ये अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा बसविण्यात येणार आहे. या सिग्नलमध्ये कॅमेरे असणार असून ते रस्त्यावरील वाहनांची मोजणी करून त्यानुसार आपल्या वेळा स्वत: बदलणार आहे. त्यामुळे ज्या बाजूला वाहनांची संख्या जास्त असेल त्या बाजूचा सिग्नल जास्तवेळ सुरू राहून वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. तसेच हे सिग्नल एकमेकांशी इंटरनेटद्वारे जोडलेले असणार आहेत. हे सिग्नल पुढील आठवड्यापासून कर्वे पुतळा ते डेक्कन आणि डेक्कन ते टिळक रस्त्याने स्वारगेट आणि स्वारगेट ते गोळीबार मैदानापर्यंत जोडले जाणार आहेत.
शहरात खासगी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली असून शहरातील रस्ते अपूरे पडत आहेत. अशा स्थितीत शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिका, वाहतूक पोलीस आणि स्मार्ट सिटीच्या माध्यमातून संयुक्तपणे उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील प्रमुख 110 चौकांमध्ये अत्याधुनिक सिग्नल बसविले जाणार आहे. हे पूर्णत: स्वयंचलित असणार असून सिग्नलला थांबलेल्या वाहनांच्या संख्येची मोजणी करून ते स्वत:ची वेळ स्वत: निश्चित करणार आहेत. तसेच सिग्नलवरून पुढे गेलेल्या वाहनांची माहिती संगणक यंत्रणेद्वारे देवाण-घेवाण करून एकमेकांच्या वेळा सिंक्रोनाईज करणार आहेत. परिणामी, ज्या रस्त्यावर वाहनांची वर्दळ अधिक असेल त्या रस्त्यावर सिग्नलचा वेळ जास्त असेल. तर ज्या रस्त्यावरील वाहने सिग्नलच्या पुढे जातील आणि एकही वाहन नसेल तेव्हा सिग्नल इतर बाजूची वाहतूक आपोआप सुरू करेल. याशिवाय, हि स्वयंचलित यंत्रना असल्याने सिंग्नलमध्ये काही बिघाड झाल्यास अथवा वाहतूक कोंडी झाल्यास कोणत्या ठिकाणी कोंडी झाली आहे याची माहितीही मेसेजद्वारे स्मार्ट सिटीच्या कमांड अँड कंट्रोल सिस्टीम, महापालिका तसेच वाहतूक पोलिसांच्या यंत्रणेला दिली जाईल.
या रस्त्यांवर बसणार
*पहिल्या टप्प्यात यंत्रणा
*कर्वे रस्ता ते गोळीबार मैदान
*स्वारगेट ते कात्रज
*स्वारगेट ते सिंहगड रस्ता
*येरवडा ते नगररस्ता
*शिवाजीनगर ते बाणेर रस्ता