कात्रजच्या प्राणी संग्रहालयातील खंदकाचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर
पुणे – महापालिकेकडून कात्रज येथील प्राणि संग्रहालयातील झेब्रा साठीच्या खंदकाचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. आता महापालिकेने युरोप तसेच इस्राइलमधून झेब्रा आणण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी सुमारे 1 कोटी 6 लाख रुपयांपर्यंत खर्च येणार आहे.
झेब्रा आणण्यासाठी महापालिकेने काढलेल्या निविदेसाठी एक ठेकेदार पुढे आला होता. मात्र, त्यांच्याकडून आंतराष्ट्रीय निकष पूर्ण होत नसल्याने आता पुन्हा नव्याने झेब्रा आणण्याची प्रक्रीया सुरू आहे. प्राणी संग्रहालयात दोन मादी आणि दोन नर, अशा चार झेब्रांचा समावेश करण्यात येणार आहे. त्याचे वय साधारणपणे 3 ते 4 वर्ष इतके असणार आहे. पुण्यातील वातावरण झेब्रांसाठी पोषक आहे. भारतात सध्या म्हैसूर, चेन्नई, हैदराबाद, केवडीया येथील प्राणी संग्रहालयामध्ये झेब्रा आहेत.
पालिकेकडून मागील वर्षापासून प्राणिसंग्रहालयासाठी झेब्रा आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सुरूवातीला तो अफ्रिकेतून आणण्याचे नियोजन होते. भारतामध्ये झेब्राचे प्रचंड आकर्षण असल्याने त्याची मागणी होते. तसेच लहान मुलांमध्येही झेब्राची क्रेझ आहे. त्यामुळे महापालिकेने प्राणी संग्रहालयात झेब्राचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पाच हजार चौरस मीटरमध्ये खंदक तयार करण्याचे काम 80 टक्के पूर्ण झाले असून सुमारे 1 कोटी रुपये खर्च महापालिकेला आला आहे.
महापालिकेकडून एक कोटी 6 लाख खर्च
भारतात झेब्रा नसल्याने ते युरोप, आफ्रिका किंवा इस्त्राइलमधून आणावे लागणार आहेत. त्यासाठीच्या सर्व परवानग्या घेण्यात आल्या आहेत. पुढील आठ ते नऊ महिन्यांत झेब्रा पुण्यात दाखल होईल. तोपर्यंत खंदकाचे कामही पूर्ण होईल. पुढील वर्षी उन्हाळाच्या सुट्टीत पर्यटकांना पाहण्यास ते उपलब्ध होतील.
– डॉ. राजकुमार जाधव,
संचालक, राजीव गांधी प्राणी संग्रहालय