महिन्याभरात 2 लाख 13 हजार प्रवाशांनी घेतला लाभ
पुणे – मेट्रो प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड येथे 10 ठिकाणांहून फिडर सेवा सुरू करण्यात आली. मागील महिन्यांत या फिडर सेवेचा लाभ 2 लाख 13 हजार 958 प्रवाशांनी लाभ घेतला. यातून पीएमपीला 2र6 लाख 70 हजारांचे उत्पन्न मिळाले.
वनाज ते रूबी हॉल आणि शिवाजीनगर ते पिंपरी-चिंचवड मेट्रो सुरू झाल्यानंतर मेट्रोने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. घरातून मेट्रो स्थानक आणि स्थानकापासून कामाच्या ठिकाणापर्यंत प्रवाशांना तत्काळ सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध व्हावी यासाठी पीएमपीकडून शहरातील 6 मेट्रो स्थानकापासून फिडरसेवा सुरू करण्यात आली. तर, पिंपरी-चिंचवडमध्ये 4 स्थानकांपासून ही सेवा सुरू आहे.
यामध्ये स्वारगेट ते शिवाजीनगर फिडर सेवेचा सर्वाधिक 1 लाख 18 हजार 818 प्रवाशांनी लाभ घेतला. त्यातून 13 लाख 12 हजारांचे उत्पन्न मिळाले. तर अन्य सिव्हिल कोर्ट ते अप्पर डेपो, डेक्कन ते वारजे माळवाडी, शिवाजीनगर ते हडपसर, पुणे स्टेशन ते मुंढवा गाव या सेवेलाही प्रवाशांचा प्रतिसाद आहे.