पुणे – अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपातून तरुणाची सत्र न्यायाधीश आर. एन. हिवसे यांनी निर्दोष मुक्तता केली आहे. पीडितेने ती रिलेशनशीपमध्ये असल्याचे उलट तपासणीत मान्य केले. तसेच, ती अल्पवयीन असल्याचे सरकारी पक्ष सिद्ध करू शकला नाही. त्यामुळे हा निकाल झाला.
नागेश काशिनाथ तुपे, असे त्याचे नाव आहे. आरोपीच्या वतीने जी. एन. ऐवळे यांनी काम पाहिले. त्यांना ऍड. सुरेश भोकरे, ऍड. विशाल पोकळे, ऍड. संतोष लोकरे आणि ऍड. आलाप ऐवळे यांनी मदत केली. 2016 मध्ये 17 वर्षीय पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्याने तिला लग्नाची मागणी घातली. त्यानंतर गणपती उत्सवात बोलण्याच्या बहाण्याने शेजारील झोपडीत नेऊन कुटुंबीयांना मारण्याची धमकी देऊन बलात्कार केला. त्यानंतर वारंवार त्याने हे कृत्य केले.
फिर्यादी 23 आठवड्याची गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. तिने पोलिसात फिर्याद दिली. दरम्यान तिने बाळाला जन्म दिला. ते बाळ आरोपीचे असल्याचे डीएनए रिपोर्टवरून सिद्ध झाले. मात्र, केवळ डीएनए रिपोर्ट म्हणजे एकमेव पुरावा असू शकत नाही, असा मुद्दा बचाव पक्षाने मांडला होता.