पुणे (प्रभात वृत्तसेवा) – करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीमेत सिरींजचा तुटवडा निर्माण झाल्याने मुबलक लस उपलब्ध असतानाही केवळ सिरींज नसल्याने लसीकरणाला खोडा बसला आहे. त्यामुळेच गुरुवारी लसीकरण होणार नाही.
केंद्राकडून राज्याला आणि राज्याकडून प्रत्येक विभागाला जेव्हा लसींचे डोस दिले जातात तेव्हा डोसच्या संख्येपेक्षा 20 टक्के जास्त सिरींज दिले जातात. यामध्ये वेस्टेज धरले जात असल्याने 20 टक्के जास्त दिले जातात. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून सिरींज कमी मिळत असल्याने लसींचे डोस असूनही ते देता येत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
काही कंपन्या “सीएसआर’च्या माध्यमातून लस देत आहेत. त्यांच्याकडूनही सिरींज मिळतात. परंतु, सरकारकडून मिळणाऱ्या सिरींजची संख्या कमी झाल्याने हा प्रश्न निर्माण झाला आहे.
महापालिकेकडे सध्या 17 हजार डोस शिल्लक आहेत, परंतु सिरींजची संख्या सहाशेच असल्याने लसीकरण करता येणार नाही. त्यामुळे गुरुवारी लसीकरण मोहीम बंद ठेवण्यात आली आहे. जर गुरुवारी सिरींज मिळाल्या तर शुक्रवारी लसीकरण होऊ शकेल अशी माहिती महापालिकेतील लसीकरण प्रमुख डॉ. सूर्यकांत देवकर यांनी दिली.
5-6 लाख सिरींजची मागणी
महापालिकेच्या लसीकरण विभागाने 5-6 लाख सिरींजची मागणी नोंदवली असून, तसे पत्र महापालिका आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांच्याकडे दिले आहे. ते पत्र त्यांनी स्टोअर विभागाकडे पाठवले असून, निविदा प्रक्रिया करून ते खरेदी करण्याला थोडा कालावधी लागेल अशी माहिती स्टोअर विभागाची जबाबदारी असलेले सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी दिली.