stock market updates: आज बुधवारी आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण झाली. बँकिंग आणि वित्तीय समभागांच्या विक्रमी घसरणीने बाजारात खळबळ उडाली आहे. दोन्ही प्रमुख निर्देशांक BSE सेन्सेक्स आणि NSE निफ्टी 50 मध्ये मोठी घसरण झाली आहे. निफ्टी 50 मधील घसरण ही जून 2022 नंतरची सर्वाधिक आहे.
आज सकाळपासून BSE सेन्सेक्स आणि NSE निफ्टी दोन्ही मोठ्या घसरणीचे संकेत देत होते. सुरुवात प्रत्येकी एक टक्का घसरणीने झाली. दिवसाचा व्यवहार जसजसा वाढत गेला तसतसा बाजारातील तोटा वाढत गेला. व्यवहाराच्या समाप्तीपर्यंत, सेन्सेक्स आणि निफ्टीचा तोटा 2.25 टक्क्यांवर पोहोचला होता, जो देशांतर्गत शेअर बाजारातील एका दिवसातील सर्वात मोठी घसरण आहे.
काल मंगळवारी सेन्सेक्स 73,128.77 अंकांवर होता. आज त्याने 71,998.93 अंकांवर मोठ्या तोट्यासह व्यापाराची सुरुवात केली. व्यवहार संपल्यानंतर सेन्सेक्स 1628.01 अंकांनी किंवा 2.23 टक्क्यांनी घसरला आणि 71,500.76 अंकांवर बंद झाला. व्यवहारादरम्यान सेन्सेक्स 71,429 अंकांपर्यंत घसरला.
आयटी समभाग वगळता सर्वांमध्ये घसरण –
केवळ टेक स्टॉक्सने बाजाराला काही प्रमाणात आधार दिला. एचसीएल टेक सर्वाधिक 1.34 टक्क्यांनी मजबूत झाला. इन्फोसिस 0.55 टक्के, टेक महिंद्रा 0.54 टक्के आणि टीसीएस 0.38 टक्के वधारले तर दुसरीकडे एचडीएफसी बँक सर्वाधिक साडेआठ टक्क्यांनी घसरली. टाटा स्टील 4 टक्क्यांहून अधिक घसरले. कोटक बँक, अॅक्सिस बँक, आयसीएआय बँक, जेएसडब्ल्यू स्टील आणि बजाज फिनसर्व्हचे समभाग 2.38 टक्के ते 3.66 टक्क्यांपर्यंत घसरण पहायला मिळाली.
निफ्टी-50 निर्देशांक 459.20 अंकांनी (2.08 टक्के) घसरून 21,571.95 अंकांवर बंद झाला. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये, निफ्टी बँक आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस दोन्ही 4.28 टक्क्यांनी घसरले. फक्त निफ्टी आयटी 0.64 टक्क्यांनी किंचित वाढला. निफ्टी आयटी आणि निफ्टी रियल्टी सारख्या क्षेत्रांमध्येही 1-2 टक्क्यांनी घसरण झाली.
बँक निफ्टीमध्ये आज सुमारे 2000 अंकांची घसरण दिसून आली. मार्च 2022 नंतर बँक निफ्टी निर्देशांकातील ही सर्वात मोठी एकाच दिवसातील घसरण आहे.
गुंतवणूकदारांचे 4.7 लाख कोटींचे नुकसान –
आज बाजारात HDFC बँक स्टाॅकमध्ये मोठी घसरण झाली. सेन्सेक्सच्या 1600 अंकांच्या घसरणीत एकट्या HDFC बँकेच्या 950 अंकांचा सहभाग आहे. एचडीएफसी बँकेच्या गुंतवणूकदारांना आज एक लाख कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे. आजचा दिवस सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्हींसाठी सुमारे दीड वर्षातील सर्वात वाईट दिवस ठरला. यापूर्वी, देशांतर्गत बाजारात जून 2022 मध्ये अशी घसरण दिसून आली होती. बाजारातील एवढ्या मोठ्या घसरणीमुळे आजच गुंतवणूकदारांचे 4.7 लाख कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे.