पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – म्हाडाने विविध उत्पन्न गटांतील नागरिकांसाठी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील 4 हजार 777 सदनिकांची सोडत जाहीर केली आहे. त्यानुसार नागरिकांना शुक्रवार (दि. 8) पासूनऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत, अशी माहिती म्हाडा पुणे विभागाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.
म्हाडा कार्यालयात सोडतीचा शुभारंभ आढळराव पाटील यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आला. त्यानुसार गुरुवारपासून नोंदणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे, तर अर्जासाठी शुल्क भरण्याची सुविधा शुक्रवारपासून सुरू होणार आहे. यावेळी म्हाडा पुणे विभागाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील उपस्थित होते.
या वेळी म्हाडा पुणे विभागाचे सभापती आढळराव पाटील यांनी सांगितले, की जानेवारी 2021 पासून सप्टेंबर 2023 पर्यंत एकूण 31 हजार 597 सदनिकांसाठी सात ॉनलाईन सोडती काढण्यात आल्या आहेत, त्यासाठी एकूण 4 लाख 8 हजार इतके अर्ज आले आहेत.
संकेतस्थळावर नोंदणी
म्हाडाच्या घरांच्या सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याकरिता अर्जदारांनी प्रथम www.mhada.gov.in अथवा https://mhada.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी, तर प्रथम येणाऱ्यास प्रधम प्राधान्य तत्त्वावरील योजनांच्या सदनिकांसाठी lottery.mhada.gov.in या संकतेस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन म्हाडाचे मुख्य अधिकारी पाटील यांनी केले आहे.
सोडतीचा तपशील
– म्हाडा योजनेअंतर्गत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य – 2 हजार 416 सदनिका
– म्हाडाच्या विविध योजनेतील – 18 सदनिका
– म्हाडा पीएमएवाय योजनेत – 59 सदनिका
– पीएमएवाय खासगी भागीदारी योजनेत -978 सदनिका
– 20 टक्के योजनेतील पुणे मनपा मध्ये 745 सदनिका
– 20 टक्के योजनेतील पिंपरी चिंचवडमध्ये 561 सदनिका