राजगुरूनगर,(प्रतिनिधी) – मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी खेड तालुक्यात 17 ठिकाणी सोमवार (दि. 12) ते मंगळवार (दि. 27) या कालावधीत शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती खेड तालुका मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अंकुश राक्षे यांनी दिली.
ज्याअर्थी सक्षम अधिकारी यांनी महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनियमन कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र तात्काळ उपलब्ध करुन देण्यासाठी या शिबिराचे आयोजन करुन, पात्र व्यक्तींना जात प्रमाणपत्र तातडीने देण्याबाबत आदेश देण्यात आलेले आहेत.
खेड तालुक्यात तहसिलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी प्रशांत बेडसे यांनी खेड कुणबी, मराठा- कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी अर्जाचे नमुने वाटप करणे, अर्ज भरुन घेणे, अर्जाचे पुरावे घेणे, अर्जाची ऑनलाईन करणे आदी कामकाज करण्यासाठी तालुक्यात ठिकठिकाणी शिबिराचेे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरासाठी महसूल कर्मचारी व आपले सरकार सेवा केंद्र चालक यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे अंकुश राक्षे यांनी सांगितले.
याठिकाणी होणार शिबिर
राजगुरूनगर (खांडगे लॉन्स), आंबोली (विठ्ठल मंदिर), चिखलगाव(जिप शाळा), येणवे (जिल्हा परिषद शाळा), वेताळे (अस्मिता भवन), वाडा (स्वामी समर्थ मंदिर), पाईट (सोमनाथ मंगल कार्यालय), कुरकुंडी (भैरवनाथ मंदिर), पाळू (विठ्ठल मंदिर), कडूस (ग्रामपंचायत सभागृह), चांडोली (सर्कल कार्यालय) चाकण (नगर परिषद सभागृह), कुरुळी (वासल्य मंगल कार्यालय), कनेरसर (ग्रामपंचायत कार्यालय), भोसे (शांताई लॉन्स), करंज विहिरे ( जिल्हापरिषद शाळा), येलवडी (ग्रामपंचायत कार्यालय).