पुणे -शहर हद्दीत आता एखाद्या मिळकतीची खरेदी-विक्री झाल्यानंतर त्याची नोंद आता महापालिकेच्या दफ्तरी करून मिळकत कराची आकारणी अथवा नावात बदल करण्यासाठी हेलपाटे मारण्याची गरज राहणार नाही. दस्त नोंदणी झाल्यानंतर खरेदीदाराची ऑनलाइन नोंद महापालिकेला प्राप्त होणार आहे. त्यामुळे मिळकत करासाठी महापालिकेत स्वतंत्रपणे जाऊन सर्व प्रक्रिया करून नोंद करून घेण्याची गरज पडणार नाही.
ही योजना मुंबई मनपा हद्दीत सुरू करण्यात आली असून आता याच धर्तीवर राज्यातील इतर महापालिकेतही याची अंमलबजावणी करण्याचा नोंदणी व मुद्रांक विभागाचा मानस आहे. भूमी अभिलेख विभागाने “ई-म्युटेशन’ योजना हाती घेतली आहे. या योजनेतंर्गत जमिनीची अथवा सदनिकांची खरेदी विक्री झाल्यानंतर त्यांची सात-बारा आणि फेरफार उताऱ्यावर नोंद घालण्यासाठी ऑनलाइन तलाठ्याकडे रजिस्टर दस्त पाठविला जातो. त्यामुळे आता नागरिकांना तलाठ्यांच्या कार्यालयात हेलपाटे मारावे लागत नाहीत.
याच प्रकल्पाच्या पुढील टप्प्यात महापालिका आणि नगरपालिका यांना देखील सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार मुंबई महापालिकेत मागील पाच वर्षांपासून याची अंमलबजावणी सुरू आहे. आता पनवेल महापालिकेनेही यासाठी पुढाकार घेतला आहे.
पनवेल महापालिकेने नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडे ही सुविधा सुरू करण्यासाठी अर्ज केला होता.
त्यानुसार ही सुविधा सुरू होणार आहे. सदनिका किंवा मालमत्तांची दस्त झाल्यानंतर महापालिकेकडील आणि दस्तातील माहिती जुळल्यानंतर तातडीने नव्या खरेदीदाराचे नाव करदाता म्हणून लागेल. अन्यथा महापालिकेकडून खरेदीदाराला संपर्क केला जाईल. नोंदणी विभागाकडून खरेदी-विक्रीदाराचे नाव, मालमत्तेचा तपशील आदी अनुषंगिक माहिती स्वयंचलित पद्धतीने पाठविली जाईल. एखाद्या मालमत्तेची खरेदी-विक्री झाल्यानंतर मिळकत पत्रिका आणि करदाता अभिलेख यांवर त्याची नोंद होते.
या दोन्ही ठिकाणी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून आता स्वयंचलित माहिती पाठविण्याची सुविधा आहे. म्हणजे मिळकत पत्रिका अद्ययावत करण्यासाठी सर्व्हर टू सर्व्हर माहिती पुढे पाठवता येऊ शकते. विभागाचा सर्व्हर आणि संबंधित महापालिकेचा सर्व्हर यांचे एकत्रीकरण करण्याची सुविधा आहे, अशी माहिती नोंदणी विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
मिळकत कर लावण्यासाठीची पारंपरिक पद्धत
दस्तनोंदणी झाल्यानंतर खरेदीराच्या नावावर ती मिळकत झाल्यानंतर मिळकत कराच्या नोंदणीसाठी महापालिका अथवा नगरपालिकांकडे स्वतंत्रपणे रजिस्टर दस्त, इंडेक्स-2 आणि आवश्यक ती कागदपत्रे सादर करावी लागत होती. त्यानंतर मिळकतीवरील नावामध्ये बदल करून कर आकारणी केली जायची.
मिळकर करासाठी नवीन प्रणाली
आता तलाठ्यांबरोबरच रजिस्टर दस्त आणि इंडेक्स ऑनलाइन पद्धतीने महापालिकेला उपलब्ध करून दिला जाणार आहे. दस्त रजिस्टर झाल्यानंतर कर नोंदणीसाठी नोंदणी कार्यालयातून ऑनलाइनच सर्व कागदपत्रे पाठविली जाणार आहे. जेणेकरून महापालिकेच्या स्तरावर संबंधित मिळकतीवर मालकाची नोंद घेऊन त्यांचे मिळकतकराचे बिल सादर दिले जाणार आहे. त्यासाठी स्वतंत्रपणे महापालिका अथवा नगरपालिकेत जाऊन सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याची गरज राहणार नाही.