पीएमआरडीएकडून मेट्रो ट्रॅकच्या कामास प्रारंभ
पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पाने गती घेतली आहे. एका बाजुला पिलर उभारण्याबरोबरच ते पिलर गर्डरने जोडण्याचे काम सुरू असताना दुसऱ्या बाजुला माण येथील मेट्रोच्या कारशेडमध्ये मेट्रो ट्रॅक टाकण्याच्या कामास शुक्रवारपासून सुरुवात करण्यात आली आहे.
हिंजवडी ते शिवाजीनगर हा मेट्रो प्रकल्प मार्च 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यादृष्टीने प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी प्रकल्पाचे काम गतीने सुरू आहे. हिंजवडीच्या आयटी हबला शिवाजीनगरला मेट्रोच्या मध्यवर्ती केंद्राशी जोडण्यात येणार आहे. माण-हिंजवडी ते शिवाजीनगर हा मेट्रो प्रकल्प 23 किलोमीटर लांबीचा असून या मेट्रो मार्गावर 23 स्टेशन असणार आहे.
हिंजवडी ते शिवाजीनगर हा मेट्रो प्रकल्प क्रमांक 3 तसेच पुणेरी मेट्रो या टोपण नावाने ओळखला जात आहे. या प्रकल्पामध्ये आता रेल्वेचे रूळ (रेल ट्रॅक) दाखल झाले असून माण येथील डेपोमध्ये रेल ट्रॅक टाकण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली. डेपोमध्ये प्राथमिक चाचणी यशस्वी झाल्यानंतर हे रूळ पुणेरी मेट्रोच्या मार्गावर बसविण्यास सुरुवात होईल, अशी माहिती मेट्रो प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आलोक कपूर यांनी दिली.
नागरिकांच्या सुविधेसाठी हाती घेण्यात आलेल्या या प्रकल्पाच्या सर्वच टप्प्यांत गुणवत्ता आणि सुरक्षितता याबाबत कुठलीही तडजोड न करण्याचे टाटा समूहाचे धोरण आहे. सर्व निकषांवर तावून सुलाखून घेतल्यावर मगच मेट्रो प्रकल्पासाठी रेल्वे ट्रॅक बसविण्याच्या प्रत्यक्ष कामाला प्रारंभ केला जाणार असल्याचे कपूर यांनी सांगितले.
प्रकल्पाची सद्यस्थिती
हिंजवडी ते शिवाजीनगर हा मार्ग 23 किलोमीटर लांबीचा.
या मार्गावर एकूण 922 पिलर असणार आहे.
त्यापैकी 796 पिलर उभारण्यात आले आहेत.
23 किलोमीटर गर्डरपैकी सुमारे 8 किलोमीटर लांबीचे गर्डर टाकण्यात आले आहेत.
35 मिनिटे लागणार
सर्वेक्षणाच्या अहवालानुसार या मेट्रो मार्गिकेच्या परिसरात दररोज 14 लाख नागरिक प्रवास करतात. या मार्गिकेमुळे प्रवाशांना शिवाजीनगर व शिवाजीनगर येथील न्यायालय येथे मार्गिका बदलून महामेट्रोच्या सेवेद्वारे शहराच्या इतर भागात जाता येईल. माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या 23 किलोमीटच्या प्रवासासाठी फक्त 35 मिनिटे वेळ लागणार आहे, असे पीएमआरडीएकडून सांगण्यात आले.