पिंपरी – राज्य परिवहन महामंडळाकडून कायमच प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जाते. याचाच एक भाग म्हणून एसटी चालक वाहन चालविताना मोबाइलवर बोलताचे आढळून आल्यास त्यांच्यावर यापुढे कारवाई होणार आहे. या संदर्भात चालकांना वरिष्ठ कार्यालयाकडून सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच यासाठी भरारी पथक लक्ष ठेवून असणार आहे.
राज्य परिवहन महामंडळ कायमच विविध उपक्रम राबवित आले आहे. मध्यंतरी डबघाईला आलेली एसटीची आर्थिक घडी बसविण्यासाठी यात्रा स्पेशल, सहली, देवदर्शन, दिवाळी, गणेशोत्सव अशा विविध योजाना राबविल्या जात आहेत. तसेच मागील वर्षापासून 75 वर्षांवरील महिलांना मोफत, त्याशिवाय इतर सर्वच महिलांना 50 टक्के, अपंग, विशेष यांसह इतर योजनांमधून एसटी महामंडळ आर्थिक घडी बसवत आहे. तसेच एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कायमच सुरक्षित प्रवास वाटतो.
त्याचा हा विश्वास अधीक दृढ करण्यासाठी या पुढे एसटी चालक वाहन चालविताना मोबाइलवर बोलताना आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. एसटी बस वाहन चालविताना मोबाइलवर बोलत असला, तर अपघात घडण्याची शक्यता असते. त्यामुळे याला आळा बसविण्यासाठी तसेच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एसटी महामंडळाकडून चालकांना सूचना देण्यात आल्या आहेत.
मोबाइलवर बोलणाऱ्या चालकांवर वचक ठेवण्यासाठी भरारी पथक लक्ष ठेवून असणार आहे. त्याचबरोबर संबंधित वाहनातून प्रवास करणारे प्रवासीही मोबाइलवर बोलत एसटी चालविणाऱ्या चालकाचा फोटो किंवा व्हिडिओ काढून वरिष्ठांना पाठवू शकतात. त्यामुळे अशा प्रकारे प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या एसटी चालकांवर वचक बसण्यास मदत होणार आहे. त्यामुळे या पुढे एसटी चालकांना वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे टाळावे लागणार असून या मुळे घडणाऱ्या अपघातांवर आळा बसणार आहे. तर, वल्लभनगर आगारातून याविषयी अद्याप कोणतीही तक्रार नसल्याचे सांगण्यात आले.