पुणे – लक्ष्मीपूजनानंतर रात्री उशिरापर्यंत शहर-उपनगरांत आतषबाजी करण्यात आली. याचदरम्यान फटाक्यांमुळे 27 ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या. अग्निशमन दलाने तातडीने आग आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला. यामध्ये कोणीही जखमी वा जीवितहानी झाली नाही. या घटना रविवारी सायंकाळी सात ते सोमवारी सकाळी सात वाजेदरम्यान घडल्या.
लक्ष्मीपूजन यांसह क्रिकेट विश्वचषकात भारतीय संघाने सलग नववा सामना जिंकला. त्यामुळे आतषबाजीला उधाण आले होते. याच कारणांमुळे ठिकठिकाणी आग लागली. अग्निशमन दलाच्या मुख्य केंद्रातील नियंत्रण कक्षात नागरिकांनी या तक्रारी नोंदवल्या. रविवारी सायंकाळी साडेसात ते रात्री दहापर्यंत 15 ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या.
यानंतर सोमवारी सकाळी सातपर्यंत उर्वरित घडना घडल्या. अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात पाठोपाठ दूरध्वनी आल्याने जवानांची धावपळ उडाली. यात प्रामुख्याने रास्ता पेठेतील के.ई.एम रुग्णालय, कोथरुडमधील सुतार दवाखान्याजवळ एका दुकानात, वडारवाडीत पांडवनगर पोलीस चौकी परिसरातील एका घरात, कोंढवा बुद्रुक पोलीस चौकीसमोर कचऱ्यावर ठिणगी पडून, नाना पेठेतील चाचा हलवाई दुकानाजवळ एका इमारतीतील सदनिकेत आग लागली.