पिंपरी – सर्वत्र दिवाळीची धामधूम आणि उत्साह पहायला मिळत आहे. मात्र, शहर व परिसरात असलेल्या वृद्धाश्रमातील ज्येष्ठांकडून मोठ्या दणक्यात साजऱ्या केलेल्या दिवाळीच्या आठवणींना उजाळा देत, गतवैभवाचे स्मरण केले जात आहे. आप्तेष्टांपासून दूर पराधीन परिस्थितीत ही दिवाळी त्यांच्या जिवाची घालमेल करणारी ठरते. यानिमित्ताने मुला-बाळांसाठी काढलेल्या खस्ता, अंगा-खांद्यावर खेळणारी- बागडणाऱ्या नातवंडांच्या आठवणी व्याकुळ करत आहेत. कुटुंबीयांना दिवाळी जोरात साजरी करता यावी, यासाठी उपसलेल्या कष्टांच्या आठवणीत आता वृद्धाश्रमात मिळालेला फराळ गोड मानत ज्येष्ठ नागरिक आपली दिवाळी साजरी करत आहेत.
दिवाळी हा सण आनंदाच सण असतो. प्रत्येक जण दिवाळी सण आपल्या कुटुंबियांसोबत आनंदात साजरा करत असतो. वृद्धाश्रमातील वृद्ध महिला आपल्या जुन्या आठवणीत आपली दिवाळी साजरी करत आहेत. येथे कशाचीच कमी नाही. हे ही एक कुटुंबच आहे, अशी याठिकाणच्या ज्येष्ठांची भावना आहे.
स्वकीयांपासून दूर झाल्यानंतर वृद्धाश्रमाने स्वीकारलेले हे ज्येष्ठ आता आम्ही एकमेकांच्या सुख-दुःखात आम्ही सोबत असतो. एकमेकांसोबत गप्पागोष्टी करत हसून खेळून राहतो. या वयात आणखी काय पाहिजे? असा सवाल करत अश्रुंना ते वाट मोकळी करून देत आहेत. वृद्धाश्रमात दिवाळी साजरी होते. फराळ, साडी चोळी भेट म्हणून दिलं जातं. मात्र त्यांना आज ही त्यांना मुलासोबत दिवाळी साजरी केलेल्या क्षणाची आठवण येत आहे.
पिंपरी- चिंचवड व मावळ परिसरात सहा ते सात वृद्धाश्रम आहेत. समाजातील अनेक जण कणव बाळगत याठिकाणी क्षमतेप्रमाणे मदत करतात. काही जण ज्येष्ठांच्या संगतीत मुलांचे वाढदिवस साजरे करतात. गोड-धोड जेवण जेवू घालत, त्यांच्या आशीर्वादरुपी सदिच्छा घेतात. वृद्धाश्रमातही दिवाळी साजरी केली जाते. मात्र, घरच्या आठवणीने त्यांच्या मनात झालेली कालवाकालव समाजाचे एक नकारात्मक रूप आपल्यासमोर आणते, हे देखील तेवढेच खरे आहे.
कुटुंबीयांपासून दूर असलेल्या ज्येष्ठांची या काळात सर्वाधिक भावनिक ओढ पहायला मिळते. तर अनेक अनाथ व निराधार नागरिकांनी पहिल्यांदाच घरगुती दिवाळी अनुभवली आहे. यामध्ये त्यांनी गड-किल्ले तर वसुबारसनिमित्त गाईची मातीची प्रतिकिृती साकारत बालपणाचा आनंद लुटला.
-प्रीती वैद्य, संचालिका, किनारा वृद्धाश्रम, मावळ.