पुणे – पुण्यातील कुख्यात सावकार नानासाहेब गायकवाड आणि त्याच्या टोळीविरुद्ध तिसऱ्यांदा मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे. बेकायदेशीर सावकारकी करणे, खंडणी उकळणे, अपहरण करणे खुनाचा प्रयत्न, जमीन बळकावणे या व अशा गुन्हेगारी कारवाया करणारा नानासाहेब गायकवाड याच्यावर पुणे व पिंपरी चिंचवड पोलिसांनी याआधीच दोन वेळा मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) दाखल केलेला आहे.
त्यानंतर आता पुन्हा आणखी एकदा नानासाहेब उर्फ भाऊ शंकरराव गायकवाड त्याची पत्नी नंदा व मुलगा गणेश यांच्यावर पुणे पोलिसांनी तिसऱ्यांदा मोक्का दाखल केला आहे. त्याने केलेल्या आर्थिक गुन्हेगारीवर लगाम लावण्यासाठीच्या दृष्टीने हा तिहेरी मोक्का लावण्यात आला आहे.
पुणे शहर पोलीस दलाचे अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी या तिसऱ्या मोक्का कारवाईला परवानगी दिली आहे. याप्रकरणी चतुश्रृगी पोलिसांनी त्याच्यावर मोक्का कारवाईचा प्रस्ताव दाखल केला होता.
आता तिहेरी मोक्का कारवाई झालेला नानासाहेब गायकवाड व कुटुंबिय पोलिसांच्या पुन्हा एकदा रडारवर आले आहेत. त्याने संघटना किंवा टोळी म्हणून संयुक्तपणे संघटित गुन्हेगारी कृत्य करणारा गट तयार केला असुन सदर टोळीने मागील १० वर्षात खुनाचा प्रयत्न करणे, दरोडा घालणे,
एखाद्या व्यक्तीस मृत्यु किंवा जबर दुखापत यांची भिती घालुन बलाचा वानर करणे, फौजदारीपात्र कट रचणे, अनैसर्गिक संभोग करणे, फसवणूक करणे, कागदपत्रांचे बनावटीकरण करणे, अडवणूक करणे, बेकायेदशीररित्या हत्यारे बाळगुन दहशत निर्माण करणे, जीवे मारण्याची धमकी देणे इत्यादी प्रकारचे गुन्हे केल्याचे निदर्शनास आले आहे