पुणे – पालिकेचे माजी आयुक्त कुणाल कुमार यांच्या नावे मेसेज पाठवून अधिकाऱ्याला 1 लाख रुपयांना गंडवत भामट्याने “झटका’ दिला आहे. मदत हवी असल्याचा मेसेज माजी आयुक्तांच्या नावे या अधिकाऱ्याला आला. त्यावर त्यांनी ऍमेझॉन कंपनीचे प्रत्येकी 10 हजार रुपयांचे दहा गिफ्ट व्हाऊचर पाठवले. त्यानंतर माजी आयुक्तांना नियमित क्रमांकावर मेसेज केला. मात्र, प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी सहकाऱ्यांना हा प्रकार सांगितला. त्यातून ही फसवणूक समोर आली.
माजी आयुक्त कुणाल कुमार यांचा फोटो व्हॉट्स ऍप डीपीला लावलेल्या मोबाइल क्रमांकावरून अनेक मनपा अधिकाऱ्यांना दि. 14 एप्रिलला मेसेज आले. त्यात “मी पुण्यात एका मीटिंगसाठी आलो आहे. मला काही मदत हवी’ अशा आशयाचा उल्लेख होता. मात्र, नंबर नवीन असल्याने काहींनी त्याला प्रतिसाद दिला नाही. तर, काही अधिकाऱ्यांनी रिप्लाय करत “काय मदत हवी आहे,’ अशी विचारणा केली. तेव्हा त्यांनी “ऍमेझॉनचे दहा हजारांचे 10 गिफ्ट व्हाऊचर द्यावेत,’ अशी मागणी केली. काहींना हा फसवणुकीचा प्रकार वाटला. त्यावर त्यांनी “अशा मेसेजला मदत पाठवू नये’ असे जागृतीपर संदेश प्रसारित केले. त्यानंतर 15 एप्रिलला असेच मेसेज विद्यमान आयुक्त विक्रम कुमार यांच्या नावे आले. त्यामुळे काही अधिकाऱ्यांनी कुमार यांना हा मेसेज पाठविला. त्यांनी हा खोटा मेसेज असल्याचे सर्व अधिकाऱ्यांना सांगितले. त्यामुळे कोणीही व्हाऊचर पाठविले नाहीत. मात्र, सहलीवर गेलेल्या अधिकाऱ्यास मेसेज खरा वाटल्याने त्याने लाखाचे व्हाऊचर पाठविले.
सायबर पोलिसांत जाण्याची सूचना
सुटीवरून परतलेल्या या अधिकाऱ्याने माजी आयुक्तांना व्हाऊचर पाठवल्याचे मंगळवारी सहकाऱ्यांना सांगितले. तसेच फोन केल्यानंतरही काहीच प्रतिसाद येत नसल्याचे सांगितले. यावेळी सहकारी अधिकाऱ्यांनी हा खोटा मेसेज असल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच सायबर पोलिसांत तक्रार करण्याची सूचना दिल्याचे काही अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.